
Kolhapur News: रस्ता बंद ,उपोषण सुरू, इंजिनीअर तरुणाची अनोखी गांधीगिरी; शिरोळ तालुक्यातील प्रकार!
पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरूणांचे घराकडे, गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात असे बोलणाऱ्यांची तोंड एका तरूणाने बंद केली आहेत. पुण्यातील एका उच्चभ्रू कंपनीत काम करणारा तरूण गावाकडील रस्ता दुरूस्तीसाठी उपोषणाला बसला आहे.
ग्रामपंचायतीने घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम केले नसल्याच्या निषेधार्त कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील रोहन मगदूम या तरूणाने हे पाऊल उचलले आहे. त्याच्याच गावातील बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा या रस्त्याचे काम अनेक वर्ष रखडले आहे.
अधिक माहिती अशी की, नांदणी बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा या ८०० मीटर पानंद रस्त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर होऊन ११ महिने उलटले तरीही रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या कामाबाबत सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाकडे वारंवार चौकशी केली. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. याबाबत चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहिती रोहनने माध्यमांशी बोलताना दिली.
पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे प्रचंड जिकिरीचे असते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी रोहनने यावेळी केली आहे. तसेच, जोवर या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोवर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्याने यावेळी प्रशासनाला दिला आहे.