कर्नाटक सरकारमुळे कोल्हापूर, सांगलीत पुरस्थिती - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री मुंबईकडे
महाजनादेश यात्रेतून वेळ काढत देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या ते मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेणार असून, राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. याशिवाय, आलमट्टी धरणामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबतही चर्चा करून कर्नाटक सरकारला सविस्तर विनंती पत्र पाठवतील, असे सांगितले जाते.

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून दोन्ही राज्यांत तू-तू मैं-मैं सुरू झाले असून, महाराष्ट्र सरकारच कर्नाटकातील पूरस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. मात्र, आलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने  आवश्‍यक तेवढे पाणी सोडले नसल्याने महाराष्ट्राच्या सांगली व कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगत, कर्नाटकने आलमट्टीतून पाच लाख क्‍युसेकने पाणी सोडावे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

बेळगाव, विजापूर, रायचूर, कलबुर्गी व यादगीर जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर बनत आहे. कोयना धरणातून महाराष्ट्रने २० हजार क्‍युसेकने पाणी सोडणे अपेक्षित असताना, त्यामध्ये वाढ करत एक लाख २५ हजार क्‍युसेक इतके पाणी सोडले आहे. त्यामुळे, कर्नाटकच्या या भागात पूर आला असून, महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. पावसाच्या पडणाऱ्या अतिरिक्‍त पाण्यासंदर्भात सरकारने काहीच केले नाही, अशी नाराजीही त्यांनी पत्रात व्यक्‍त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Sangli Flood Devendra Fadnavis BS Yeddyurappa Karnataka Government