कोल्हापूर, सांगलीची एसटी सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसाचा फटका एसटीच्या वाहतुकीला बसला. मंगळवारी (ता.६) पुण्याहून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एसटी वाहतूक बंद केली. कोकणातील वाहतूकही सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित राहिली.

पुणे - मुसळधार पावसाचा फटका एसटीच्या वाहतुकीला बसला. मंगळवारी (ता.६) पुण्याहून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एसटी वाहतूक बंद केली. कोकणातील वाहतूकही सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित राहिली.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पाणी आले. त्यामुळे वाहतूक बंद केली, तर इतर काही ठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू होती. स्वारगेट स्थानकातून कोल्हापूर, सांगलीला जाणाऱ्या चाळीस फेऱ्या रद्द केल्या. कोकण परिसरातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून पुण्याकडे बसगाड्या आल्या नाहीत. तसेच जिल्ह्यातील मुळशी, पौड आदी भागांतील 

वाहतूक बंद ठेवल्याने प्रवाशांना फटका बसला. दरम्यान, मुंबईकडील वाहतूक सुरू असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

कोल्हापूरला बसने जाण्यासाठी स्थानकावर आलो होतो. मात्र, पावसामुळे वाहतूक बंद केल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पुन्हा सुरू होईल म्हणून चार तासांपासून स्थानकावर थांबून आहे. 
- अविराज श्रीखंडे,  प्रवासी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur, Sangli ST services closed due to rain