कोल्हापुरात ऊसदराचा तिढा सुटला 

कोल्हापुरात ऊसदराचा तिढा सुटला 

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला विनाकपात एकरकमी रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा शनिवारी सुटला. 
भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर "एफआरपी'व्यतिरिक्त 200 रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी पुकारलेले चक्का जाम आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यापुरते मागे घेतल्याचेही जाहीर केले. 15 दिवसांपासून जिल्ह्यातील बंद असलेले सर्व कारखाने सोमवारपासून (ता. 12) सुरू करणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस हंगाम तातडीने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून प्रतिटन 2800 ते 3000 रुपये एकरकमी "एफआरपी' मिळणार आहे. 

कारखानदार, कारखानदार व शेतकरी संघटना, पुन्हा कारखानदार अशा चर्चेच्या फेरी दिवसभर झाल्यानंतर एकरकमी "एफआरपी' देण्यावर कारखानदारांचे एकमत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी फारशी ताणाताणी न करता या निर्णयला संमती दर्शविली. खासदार राजू शेट्टी परगावी असल्याने ते चर्चेत सहभागी होऊ शकले नाहीत, मात्र बैठकीत होणारा प्रत्येक निर्णय दूरध्वनीद्वारे त्यांना कळविला जात होता व त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले जात होते. 


""काही कारखानदारांनी पुढाकार घेऊन यात तडजोड घडवून आणली. यानंतर हा निर्णय झाला. गेल्या हंगामातील शिल्लक रक्कम ताबडतोब देण्याचे कारखान्यांनी मान्य केले. यामुळे जिल्ह्यातील आंदोलन मागे घेत आहोत. "एफआरपी' बेस साडेनऊ करण्याची लढाई आमची सुरूच राहील. खासदार राजू शेट्टी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. 

- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

अन्य ठिकाणी आंदोलन सुरूच 
ऊसदराचा तोडगा फक्त कोल्हापूर जिल्ह्यात निघाला आहे. राज्यातील इतर कारखान्यांनी भूमिका जाहीर न केल्याने रविवारी (ता. 11) होणारे "चक्का जाम' व गावे बंद आंदोलन कोल्हापूर जिल्हा वगळता सुरूच राहणार असल्याचे "स्वभिमानी'तर्फे जाहीर केले. 

2800 ते 3000 रुपये दर 

ऊसदराचे गणित 
11 ते 13 टक्के 
साखर उतारा 

2800 ते 3000 रुपये 
कारखान्यांच्या उताऱ्यानुसार अपेक्षित दर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com