सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कोल्हार - शेतीमालाचे भाव पडत असताना केंद्र सरकारला मात्र त्या प्रश्नाचे गांभीर्य नाही. सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था राहिली नाही. हे चित्र सवंग लोकप्रियतेचे असून, ती लोकपरिवर्तनाची नांदी दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

कोल्हार - शेतीमालाचे भाव पडत असताना केंद्र सरकारला मात्र त्या प्रश्नाचे गांभीर्य नाही. सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था राहिली नाही. हे चित्र सवंग लोकप्रियतेचे असून, ती लोकपरिवर्तनाची नांदी दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

स्वातंत्र्यसेनानी पी. बी. कडू पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना समाजक्रांती पुरस्काराने गौरविण्यात आले. सात्रळ (ता. राहुरी) येथे झालेल्या या कार्यक्रमात पवार बोलत होते. आमदार दिलीप वळसे पाटील अध्यक्षस्थानी होते.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकऱ्याला आधी मजबूत करावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करून, पवार म्हणाले, की शेतकरी कोट्यवधी देशवासीयांची ताकद आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करण्याची गरज आहे. साखरेचे आजचे भाव 2920 रुपये झाले. तुरीचे भाव पाच हजारांवरून 3800 रुपयांपर्यंत खाली आले. इतरही शेतीमालाची स्थिती तशीच झाली आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर शेतीमालाचे भाव आणखी कोसळतील, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, 'आमच्या सरकारच्या काळात शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती. तशी परिस्थिती न राहिल्यास अर्थव्यवस्था अडचणीत येईल. या देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचा विचार न झाल्यास शेतीव्यवस्था उद्‌ध्वस्त होईल व देशाला पुन्हा आयात केलेला गहू खाण्याची वेळ येईल.'' काही वर्षांपूर्वी आयात केलेला "मिलो' देशाला खावा लागल्याची आठवण पवार यांनी करून दिली.

"सत्तेचा वापर लोकहितासाठीच हवा'
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विचाराने काम करणारे म्हणून काहींना पटत असतील, त्यांना पाठिंबा मिळत असल्याचेही चित्र उभे केले जात असले, तरी कोणताही निर्णय लोकांच्या हिताचाच असला पाहिजे. सत्तेचा वापरही त्यासाठीच केला गेला पाहिजे. त्यावरच नेतृत्वाचे खरे महत्त्व असते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: kolhar nagar news sharad pawar talking