कोकण, मध्य महाराष्ट्रात "झोडधार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राने मॉन्सूनला बळकटी दिल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडून काढले आहे, तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक 299 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
उल्हासनगर, किन्हवली, कुंभार्ली (सर्व ठाणे), नेरळ, कळंब (सर्व रायगड), कांचड, साखर, मोखडा, तलासरी, झरी (पालघर), इगतपुरी (नाशिक), लोणावळा (पुणे), महाबळेश्‍वर, तापोळा, लामज (सर्व सातारा), गडचिरोली, ब्राह्मणी (गडचिरोली).

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी (ता. 18) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाडा
- औरंगाबाद - संततधार, पण जोर कमीच
- उस्मानाबाद - भीजपाऊस, पीकवाढीसाठी पोषक
- लातूर - संततधार, आतापर्यंत सरासरी 303 मिलिमीटर पाऊस
- बीड - सर्वदूर संततधार पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षाच
- हिंगोली - नऊ दिवसांपासून पाऊस सुरुच
- परभणी - दिवसभर संततधार
- नांदेड - गेल्या 24 तासांत किनवट, माहूर, उमरी तालुक्‍यांत 126 मिलिमीटर पाऊस.

पश्‍चिम महाराष्ट्र
- मुळा धरणात नऊ हजार चारशे दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा
- मध्यमेश्‍वर बंधाऱ्यातून 10 हजार क्‍युसेकने पाणी गोदावरीत
- कोयनानगरला 242 मिलिमीटर, महाबळेश्‍वरला 259 मिलिमीटर, तर नवजा येथे 337 मिलिमीटर पावसाची नोंद
- कोयना धरणातील पाणीसाठा 72 टीएमसीवर
- महाबळेश्‍वरात वेण्णा लेक परिसर जलमय
- कास पूल पाण्याखाली गेल्याने बामणोली संपर्काबाहेर

खानदेश
- जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ विभागांत रिमझिम

उत्तर महाराष्ट्र
- गोदावरी दुथडी; पाचही धरणांतून विसर्ग सुरू
- नाशिकच्या आदिवासी विभागांत अतिवृष्टी

विदर्भ
- गोंदिया जिल्ह्यात दमदार, भंडारा जिल्ह्यातील तुमसरला मुसळधार
- गडचिरोलीत मुसळधार, भामरागड-आलापल्ली मार्ग बंद
- पर्लकोटा नदीला पूर, 150 गावांचा संपर्क तुटला
- नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये रिपरिप

कोल्हापूर-कोकण
- पंचगंगा पात्राबाहेर, जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक बंद
- सांगली जिल्ह्यात संततधार, चांदोली धरणातून विसर्ग सुरूच
- सिंधुदुर्गात जोर कायम, अनेक मार्ग बंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan central maharashtra rain monsoon