‘ती’ असती, तर जिंकलो असतो!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

कोपर्डी - ‘‘आमच्या विद्यालयाचा मुलींचा खो-खो संघ पहिल्यांदाच राज्यपातळीवर गेला. तेथे जिंकून आम्ही तिला श्रद्धांजली वाहणार होतो. मात्र, अखेर तिची उणीव जाणवलीच! आम्ही पुढे जाऊ शकलो नाही... ती असती, तर आम्ही नक्की जिंकलो असतो..,’’ अशा शब्दांत ‘निर्भया’च्या वर्गमैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने देवाच्या दारात न्याय झाला, असे सांगताना मुलींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

कोपर्डी येथील अत्याचाराची घटना देशात गाजली. ‘निर्भया’चे घर, गावासह नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवटपर्यंत चर्चेत राहिले. आरोपींना काय शिक्षा होते, याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, आज ती आमच्यात नाही, ही रुखरुख वर्गमैत्रिणींना जास्त अस्वस्थ करीत होती.

आकांक्षा गुंड, पूजा गायकवाड, वैष्णवी सुपेकर, वृषाली भवाळ, शीतल गुंड या तिच्या वर्गमैत्रिणींनी ‘सकाळ’कडे भावना व्यक्त केल्या. त्या वेळी अनेकदा त्यांचे डोळे भरून येत होते. त्या म्हणाल्या, ‘‘ती आमच्यात नाही, याचे मोठे दु:ख आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याने भविष्यात मुलींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही हिंमत कोणी करणार नाही. आम्हीही आता कणखर झालो आहोत. तिला न्याय मिळाल्याने मनात कुठेतरी समाधान आहे.’’

‘निर्भया’च्या आठवणींना उजाळा देताना आकांक्षा म्हणाली, ‘‘ती खूप निडर होती. खो-खो खेळताना तिची चपळाई आम्ही पाहायचो. तिच्यानंतर आम्ही खो-खोपासून दुरावलो होतो. मात्र, शिक्षकांनी ‘तिच्यासाठी खेळा’ असा कानमंत्र दिला. त्यानंतर आम्ही जोमाने तयारी सुरू केली. तिच्यासाठी जिद्दीने खेळलो. पहिल्यांदाच आमचा संघ राज्यपातळीवर पोचला. तेथेही तिच्यासाठी जिद्द दाखविली. मात्र, अखेर तिची उणीव जाणवली. ती असती, आम्ही नक्कीच विजेतेपद मिळविले असते.’’

‘निर्भया’ खेळासह अभ्यासातही हुशार होती. अत्याचारानंतर तिच्या मैत्रिणी हताश झाल्या होत्या. मात्र, तिच्यासारखेच खेळायचे, अभ्यास करून नाव कमवायचे, या जिद्दीने पेटलेल्या मुलींनी राज्यपातळीवर संघ नेला. त्यामुळे ती मागे पेटलेली पणती ठेवून गेल्याचे समाधान आहे. 
- सूर्यभान सुद्रिक, प्राचार्य, नूतन विद्यालय, कुळधरण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kopardi Court Ujjwal Nikam Ahmednagar District Kopardi Case Kopardi Rape And Murder Maharashtra student