कठोर शिक्षेने कायद्याला बळकटी - ॲड. निकम

कठोर शिक्षेने कायद्याला बळकटी - ॲड. निकम

नगर - ‘‘समाजात अशा प्रकारचे दुष्कृत्य होणार नाही, यासाठी कठोर शिक्षा अपेक्षित असते. आरोपींना कठोर शिक्षा मिळाल्यास कायदा बलवान होतो. कोपर्डी खटल्यात १३ मुद्दे महत्त्वाचे ठरले,’’ असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘कोपर्डी खटला आव्हानात्मक होता. सरकारपक्षाला परिस्थितिजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात सिद्ध करावी लागली. आरोपी जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीवर बलात्कार करून खून केला. आरोपी गोरख भवाळ, नितीन भैलुमे हेदेखील कटात सामील असल्याचे सिद्ध करायचे होते. नगर जिल्ह्यातील हा दुसरा खटला होता. लोणी-मावळा येथील घटनेतही हेच झाले होते. दोन्ही गुन्ह्यांमध्ये छेड काढणाऱ्या मुलांबद्दल पीडित मुलीने कोणाकडेही तक्रार केली नाही. परिणामी, मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेली. हे सगळे सिद्ध झाले.’’

ॲड. निकम म्हणाले, ‘‘आरोपींनी पीडित मुलीला किती निर्दयपणे मारले? अशी विकृती कधी पाहिली नव्हती. ती या खटल्याच्या निमित्ताने समोर आली. गुन्हा करून नामानिराळे राहता येत नाही, हे या खटल्यावरून स्पष्ट झाले. कट हा नेहमी अंधारातच केला जातो. कट रचणारे पडद्यामागचे कलाकार असतात. आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी घटनेच्या दोन दिवस आधी जितेंद्र शिंदेबरोबर राहून पीडित मुलीची छेड काढली. तेथूनच कटाला सुरवात झाली. हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार आहे.’’

‘‘कठोर शिक्षा झाल्यास समाजात वचक निर्माण होतो. त्यामुळे कायद्याला बळकटी येते. त्यासाठी न्यायालयात महत्त्वाचे १३ मुद्दे मांडले. ते न्यायालयाने ग्राह्य धरले आणि आरोपींना फाशीची शिक्षा दिली,’’ असे ते म्हणाले.

ॲड. निकम यांचा सत्कार
न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांच्या मोटारीत बसून निघाले. मोटर न्यायालय प्रवेशद्वारावर येताच नागरिकांनी त्यांना अडविले. ॲड. निकम यांचे आभार मानत, पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com