फुटला अश्रूंचा बांध

फुटला अश्रूंचा बांध

नगर - कोपर्डीतील अत्याचार आणि खून खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावताच कोपर्डीच्या ‘निर्भया’च्या आईने टाहो फोडला. न्यायदान कक्षातच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. ‘निर्भया’ची बहीण, आजी व अन्य नातेवाइकांनाही रडू कोसळले. न्यायदान कक्षातून बाहेर आल्यावरही आईचे आणि नातेवाइकांचे अश्रू थांबत नव्हते. फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर तिन्ही आरोपींचे चेहरे सुरवातीला निर्विकार होते. पश्‍चात्तापाचा भाव मात्र स्पष्ट दिसत होता. 

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही आरोपींना समोर बोलावून क्रमानुसार उभे केले. ज्या कलमांखाली दोषी धरले, त्यानुसार शिक्षा देत असल्याचे तिघांनाही सांगितले आणि शिक्षा ऐकविली. आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याचे ऐकताच पीडित मुलीच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. 

या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना आज शिक्षा सुनावली जाणार असल्याने सकाळी आठपासूनच न्यायालयाच्या परिसरात गर्दी व्हायला सुरवात झाली. निकाल ऐकण्यासाठी पीडितेचे आई-वडील, बहीण, आजी, मैत्रिणी आणि अन्य नातेवाईक साडेनऊ वाजता न्यायालयात आले. प्रक्रियेला अकरा वाजता सुरवात होणार असल्याचे सांगण्यात आले, तरी सकाळी दहा वाजताच न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या कक्षात वकील, पत्रकार, नागरिक, पीडितेचे नातेवाईक व अन्य लोकांनी गर्दी केल्यामुळे बसायला जागा राहिली नाही. त्यामुळे अनेकांना उभे राहावे लागले. पीडितेची आई व अन्य महिला निकाल ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत बसल्या होत्या. पोलिस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा कक्षात खडा पहारा होता. 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी कक्षात आगमन झाले. अकरा वाजून ३२ मिनिटांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांचे आगमन झाले. आरोपींचे वकील ॲड. योहान मकासरे, ॲड. बाळासाहेब खोपडे, ॲड. प्रकाश आहेर कक्षात दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावे एकदा पुकारा करण्यात आला; मात्र ते येणार नसल्याचे कळताच न्यायाधीश केवले यांनी आरोपींना समोर बोलावून क्रमानुसार उभे केले. सुरवातीला विनयभंगाच्या कलमाखाली तीन वर्षांची सक्तमजुरी; बलात्कार, त्यासाठी मदत आणि खून या गुन्ह्यांमध्ये दोन वेळा जन्मठेप व फाशीची शिक्षा देत असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. 

फाशीची शिक्षा दिल्याचे ऐकताच, न्यायदान कक्षात उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या; मात्र पीडित मुलीच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. सोबत असलेल्या नातेवाईक महिलांनाही रडू कोसळले. पीडितेची आई आणि नातेवाईक महिला कक्षाबाहेर न्यायालयाच्या परिसरात आल्या तरी रडतच होत्या. शिक्षा जाहीर झाली त्या वेळचे न्यायदान कक्षातील वातावरण हृदय हेलावणारे होते. 

सर्व जण गेल्यावर तो ढसाढसा रडला 
कोपर्डी खटल्यातील आरोपींना न्यायाधीशांनी समोर बोलावून फाशीसह अन्य शिक्षा आणि दंड केल्याचे सांगितले, त्या वेळी तिन्ही आरोपींचे चेहरे निर्विकार होते; मात्र चेहऱ्यावर पश्‍चात्तापाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. ते शांतपणे पुन्हा आपापल्या जागेवर जाऊन बसले. शिक्षा जाहीर होताच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व न्यायाधीश कक्षातील लोक बाहेर गेले. कक्ष मोकळा झाला; फक्त आरोपींचे संरक्षण करणारे पोलिस तेथे होते. न्यायाधीशही कक्षातून गेल्यावर मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे ढसाढसा रडला. त्या वेळी अन्य दोन आरोपीही रडवेल्या चेहऱ्याने बसले होते.

‘छकुलीसारखी वेळ कोणावरही येऊ नये’
‘आरोपींना फाशीची शिक्षा झाली; पण माझ्या छकुलीसारखी वेळ कोणावरही येऊ देऊ नका,’ अशी आर्त हाक ‘निर्भया’च्या आईने न्यायालयाच्या आवारात दिली.

‘निर्भया’चे आई-वडील न्यायालयाबाहेर आल्यानंतर राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या महिलांनी त्यांना गराडा घातला. प्रत्येक महिलेच्या गळ्यात पडून आई दु:खाला वाट मोकळी करून देत होती. ‘दीड वर्षापासून छकुलीचा आवाज माझ्या कानात घुमतोय... दर शनिवारी मला छकुलीची लई आठवण येते. मला अजूनही मम्मे... मम्मे... म्हणून हाक मारीत होती. मम्मे, मला हे खायचं, मम्मे, मला ते खायचं, असा हट्ट माझ्याजवळ धरायची...’ असे म्हणून आई धाय मोकलून रडत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला गराडा घातला होता. ‘समद्या महाराष्ट्राने माझ्या छकुलीला न्याय दिला... मराठा समाजाच्या सगळ्या संघटना आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभ्या राहिल्या... आमचं दु:ख वाटून घेतलं... वासनांध आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. आज त्या भामट्यांना शिक्षा झाली; पण माझी छकुली परत येणार नाही,’ असे म्हणून त्या मातेने डोळ्यांवर पदर घेतला. ‘माझ्या छकुलीसाठी सबंध मराठा समाज एकत्र झाला. समाजाने असे एकत्र राहून लढत राहावे. छकुलीसारखी वेळ कोणावरही येऊ देऊ नका,’ अशी विनंतीवजा मागणीच त्या माऊलीने समाजाकडे केली.

आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असताना बापाचे मूक आक्रंदन सुरू होते. मध्ये मध्ये मोठा सुस्कारा ते टाकीत होते. ‘आम्हाला न्याय मिळाला. माझ्या लेकराला हीच श्रद्धांजली,’ असे सांगत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com