कोपर्डी: तिन्ही आरोपी दोषी; पुढील सुनावणी आता २१ नोव्हेंबरला

सूर्यकांत नेटके  
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

नगर - कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा खून केल्याच्या आरोपावरुन विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना आज (शनिवार)  दोषी ठरविले. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ(वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) अशी दोषींची नावे आहेत.

निकालाची अपेक्षा असल्याने आज न्यायालयात गर्दी झाली होती. येत्या 21 नोव्हेंबरला त्यावर सरकारी पक्षाचे व आरोपींच्या वकीलांना बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर निकाल घोषित होण्याची शक्‍यता आहे.

नगर - कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा खून केल्याच्या आरोपावरुन विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना आज (शनिवार)  दोषी ठरविले. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ(वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) अशी दोषींची नावे आहेत.

निकालाची अपेक्षा असल्याने आज न्यायालयात गर्दी झाली होती. येत्या 21 नोव्हेंबरला त्यावर सरकारी पक्षाचे व आरोपींच्या वकीलांना बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर निकाल घोषित होण्याची शक्‍यता आहे.

काय आहे कोपर्डी प्रकरण?

कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकाणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही होत मोडलेले होते. 

पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवला. या खटल्यात 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या  ठरल्या. सरकार पक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

आरोपीतर्फे विधी सेवा प्राधिकरणचे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, विजयालक्ष्मी खोपडे, ऍड. प्रकाश आहेर यांनी बाजू मांडली. 21 तारखेला आरोपी 3 तर्फे तर आरोपी 1 व 2 तसेच सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद. त्यानंतर त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या तारखेला शिक्षा सुनावली जाणार असल्याचे स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. तीनही आरोपीला खून, अत्याचार, खूनाचा व अत्याचाराचा कट, प्रोत्साहन देणे,  छेडछाड, बालकांच्या अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अशा सहा कलमाखाली तीनही आरोपीला दोषींवर धरले आहे.

कोपर्डीचा घटनाक्रम : 

13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून. 
14 जुलै : मध्यरात्री गुन्हा दाखल, कर्जत बंद आणि "रास्ता रोको', आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून पकडले. 
पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अपर पोलिस अधीक्षक घनश्‍याम पाटील, उपअधीक्षक विजय लगारे घटनास्थळी. 
14 जुलै : कर्जतमध्ये महाविद्यालयीन तरुणांसह ग्रामस्थांचा आरोपींच्या अटकेसाठी "रास्ता रोको'. 
14 जुलै : "निर्भया'वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. 
15 जुलै : कोपर्डीत "चूल बंद', श्रीगोंदे, जामखेडमध्येही "बंद'. 
15 जुलै : मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याला पोलिस कोठडी. 
16 जुलै : विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे सर्वपक्षीय "रास्ता रोको'. 
दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पालकमंत्री राम शिंदे यांची कोपर्डीस भेट. 
16 जुलै : खटल्याच्या कामकाजासाठी सरकारपक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी. 
16 जुलै : अन्य दोन आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे व संतोष गोरख भवाळ यांना अटक. सोशल मीडियावर घटनेचे तीव्र पडसाद. 
आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा नगर शहर वकील संघटनेचा ठराव. 
17 जुलै : नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना न्यायालयात आणले असता शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली; दोन कार्यकर्त्यांना अटक. 
17 जुलै : सामाजिक संघटनांची पीडित कुटुंबीयाला भेट. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे कोपर्डीत दाखल. 
17 जुलै : रोजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कोपर्डीत. पालकमंत्र्यांच्या फोटोसोबत आरोपीचा फोटो टाकून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी जामखेडमध्ये गुन्हा दाखल. तृप्ती देसाई यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. 
18 जुलै : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कोपर्डी प्रकरणावरून खडाजंगी. विरोधकांनी कामकाज बंद पाडले. 
18 जुलै : विविध पक्ष व संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्ह्यात सर्वत्र "बंद'. 
माजी मंत्री सुरेश धस, चंद्रशेखर घुले, आमदार अरुण जगताप यांचा मोर्चात सहभाग. 
18 जुलै : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मृत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन. 
19 जुलै: विधानसभेत विरोधकांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी. ही घटना क्‍लेशदायक, मानवतेला काळिमा फासणारी; अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भावना. 
19 जुलै : शालेय विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन तरुणींचा तहसीलवर मोर्चा, जिल्हाभर मोर्चे, प्रशासनाला निवेदने सादर. आरोपींच्या पुतळ्याचे दहन. 
20 जुलै : पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला कोपर्डीत. महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्‍वासन. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची कोपर्डी भेट. 
20 जुलै : सकाळ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने पीडीत मुलगी व तिची बहीण शिकत असलेल्या कुळधरण (ता. कर्जत) येथील विद्यालयातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी यांच्याकडून स्वसंरक्षणाचे धडे. 
21 जुलै : माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी कोपर्डीत जाण्यापासून रोखले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री राम शिंदे यांची कोपर्डी भेट. जिल्ह्यात पुन्हा कॅंडल मार्च, "रास्ता रोको', निवेदने. 
22 जुलै : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कोपर्डीला भेट. सूर्योदय परिवारातर्फे दोन स्कूल बस भेट. 
23 जुलै : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना न भेटण्याचा पीडितेचा कुटुंबियांचा निर्णय. त्यामुळे आठवले यांचा कोपर्डी दौरा अचानक रद्द. दलित नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांना कोपर्डीत जाण्यास पोलिसांचा मज्जाव. 
24 जुलै : कमालीची गुप्तता पाळीत मुख्यमंत्र्यांचा बारामती मार्गे कोपर्डी दौरा. "महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करू, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम खटल्याचे कामकाज पाहणार,' अशी घोषणा. 
25 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोपर्डीत. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आरोपींना न्यायालयात मारहाण करण्याचा प्रयत्न. आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्यात आला. 
26 जुलै : कोपर्डी येथील पीडितेच्या कुटुंबीयांकडून शस्त्रपरवान्यासाठी अर्ज. 
27 जुलै : आरोपी जितेंद्र शिंदेच्या पोलिस कोठडीत वाढ. 
28 जुलै : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाकडून (सोनई) पीडित मुलीच्या बहिणीच्या शैक्षणिक पालकत्वाची तयारी. 
30 जुलै : आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी अर्ज. 
9 ऑगस्ट : सकल मराठा समाजाचा औरंगाबादला राज्यातील पहिला मोर्चा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी. 
23 सप्टेंबर : सकल मराठा समाजाचा नगरला भव्य मोर्चा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी. 
7 ऑक्‍टोबर : घटनेच्या 85व्या दिवशी तीनही आरोपींविरुद्ध 70 साक्षीदारांचा समावेश असलेले 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्याकडून दाखल. 
20 डिसेंबर : कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरु 
1 एप्रिल 2017 : शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींवर सशस्त्र हल्ला. 
24 मे : कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण. 
16 ऑक्‍टोबर : अंतिम युक्तीवाद सुरु 
8 नोव्हेंबर : अंतिम युक्तिवाद संपला 

Web Title: kopardi rape case nagar news police