विजयस्तंभास जनसागराची मानवंदना

विजयस्तंभास जनसागराची मानवंदना

कोरेगाव भीमा - पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आज विजयदिनी राज्यभरातून विक्रमी संख्येने आलेल्या नागरिकांनी अलोट गर्दी केली. दिवसभर विविध पक्ष व संघटनांच्या वतीने रॅली व अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली.

पेरणेफाटा येथील नियोजित कार्यक्रमास मंगळवारपासूनच सुरुवात झाली. आज सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, भारतमुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती सी. एम. थुल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष लता शिरसाट, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मीराताई आंबेडकर, दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण यांसह बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, भीमा कोरेगाव 

विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदींसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. 

या ठिकाणी विविध पक्षसंघटनांच्या सभा, संमेलने, मेळावे, पुस्तक प्रदर्शन-विक्री असे अनेक कार्यक्रम झाले. ‘शौर्य पहाट’ कार्यक्रमासाठी आणि विजयस्तंभस्थळी व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाला पेरणे ग्रामपंचायतीबरोबरच विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष 

सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रमुख युवराज बनसोडे यांसह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत होते. 

तसेच, ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बार्टी’कडून मोफत जेवण, पाणी तसेच ग्रंथांचे सवलतीत वितरण करण्यात आले.

प्रशासनावर गर्दीमुळे ताण
जिल्हा प्रशासन, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ व पेरणे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील कार्यक्रमाचे नियोजन केले. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे-नगर रस्त्यावर चारही बाजूंनी येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. तसेच, अंतर्गत वाहतुकीसाठी २६० बसची व्यवस्था केली होती. मात्र, त्यावरही ताण आला. तसेच, नगर रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. या वर्षीही येथे येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. तरीही, दुपारनंतर वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासनाने केलेल्या नियोजनावर ताण आला.

प्रशासनाचे काटेकोर नियोजन
ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या तिहेरी व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरू होता.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईतील शूर सैनिकांच्या या शौर्यस्थळाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येथील विकास व सोयीसुविधांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- रामदास आठवले,  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री 

कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कारण जातीय सलोखा कायम राखत आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा असून, ती आपण जतन केली पाहिजे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिस व पुणे शहर पोलिसांच्या तपासात एकवाक्‍यता दिसत नाही; परंतु दंगलीतील दोषींवर योग्य कारवाई होईल.
-ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रमुख, वंचित बहुजन आघाडी

पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभ परिसरात सरकारने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच, हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा.
-वामन मेश्राम, प्रमुख, बामसेफ  व भारतीय मुक्ती मोर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com