कोयनेची वीजनिर्मिती ठप्प

Koyana Dam
Koyana Dam

कोयनानगर - कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा राहिल्याने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, यामुळे चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच वीजनिर्मितीचे तीन टप्पे कमी दाबाने सुरू आहेत. मात्र त्यातून १२० मेगावॉट इतकी अत्यल्प वीजनिर्मिती होणार आहे. एकूण १९५६ मेगावॉट क्षमता असलेल्या कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद होण्याची ही पहिलीच वेळ असून, आगामी काळात राज्याला अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

याबाबत सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर म्हणाल्या, ‘‘धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंघल यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पुढील आदेश प्राप्त झाल्यावरच वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत कोयना जलविद्युात प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोराळे म्हणाले, ‘‘कोयना जलविद्युत प्रकल्पाची एक हजार ९६० मेगावॉट वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा आदेश आज सायंकाळी ५.३० ला देण्यात आले आहेत. मात्र, टप्पा १,२,३ हे वीजनिर्मितीचे प्रकल्प बंद केल्यास चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे हे टप्पे कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येणार नाहीत.’’   

धरणात सध्या ११.३९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून ३४.४० व धरणाच्या आपत्कालीन विमोचक्र दरवाजातून ४.५० असा एकूण ३८.९० टीएमसी पाणीसाठा सोडण्यात आला आहे. सिंचनाला प्रथम प्राधान्य असल्याने धरणातून प्रतिदिन तीन हजार १०० क्‍युसेक पाणी देण्यात येते. पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी धरणातून ६३.६७ टीएमसी असा एकूण १०२.५७ टीएमसी पाणीसाठा देऊन अख्खे धरण रिकामे केले आहे. पश्‍चिमेकडील वीजप्रकल्पासाठी ३.४६ टीएमसी पाणीसाठा वापरणे शिल्लक आहे. पाण्याचा वीजकंपनीने वापर करू नये, यासाठी कोयना प्रकल्पाने पाणी कपातीचे आवाहन केले होते. कोयना प्रकल्पाच्या आवाहनाला महानिर्मिती कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत वीज निर्मितीसाठी शिल्लक असलेले तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात धरणात पाच टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन सिंचन व वीजनिर्मितीला देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोलमडले आहे. धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक जूनपासून पाणी कपात करण्याऐवजी पश्‍चिमेकडील वीज निर्मिती पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी व सिंचन मंडळाने महा वीजनिर्मिती कंपनीला काढला आहे. 

राज्याची वीजनिर्मिची क्षमता (मेगावॉटमध्ये)
थर्मल वीज प्रकल्प

- कोराडी २४००
- नाशिक ६३०
- भुसावळ १२१०
- पारस ५००
- परळी ११७०
- के खेडा १३४०
- चंद्रपूर २९२०

गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन
- उरण जीटी ४३२
- डब्ल्यू एच आर २४०

हायड्रोपॉवर स्टेशन
- कोयना १९५६
- स्मॉल हायड्रो ३७४
- घाटघर पंप स्टोअरेज २५०

सौर ऊर्जा - १८०

एकूण १३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com