कोयनेत पूरस्थिती शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणेसहा फूट उचलण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहासह नदीपात्रात 50 हजार 420 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जलाशयातील एकूण पाणीसाठा 102.33 टीएमसी झाला असून, पाणीपातळी 2161.03 फूट आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जलाशयात 29 हजार 264 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. 11 ऑगस्टपासून 50 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद प्रत्येक दिवशी होत आहे. जलाशयाच्या परिचालन सूचीनुसार पाणीसाठा नियंत्रणासाठी मंगळवारी दरवाजे अडीच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. एकूण 23 हजार 381 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने व पाणीसाठा नियंत्रणात येत नसल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता दरवाजे अर्ध्या फुटाने उचलले होते. मात्र, येणारे पाणी व होणारा विसर्ग याचा ताळमेळ बसत नसल्याने आज 12 वाजता दरवाजे चार फुटांवर नेण्यात आले. नंतर सायंकाळी पाच वाजता धरणाचे दरवाजे पावणेसहा फुटांवर नेण्यात आले. त्यामुळे दरवाजांतून 48 हजार 320 क्‍युसेक व पायथा वीजगृहातून दोन हजार 100 असा एकूण 50 हजार 420 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी उशिरा मूळगावचा पूल पाण्याखाली जाईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. शिवाय, नदीकाठच्या हजारो हेक्‍टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाणार आहेत.

चोवीस तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोयनानगर 103
नवजा 148
महाबळेश्‍वर 131

Web Title: Koyana Dam water Flood