कोयनेत गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा कमी

Koyana Dam
Koyana Dam

पाटण - योग्य नियोजन व संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी असताना सिंचन व वीजनिर्मितीसाठी काटेकोर अंमलबजावणी केली असल्याने कोयना जलाशयात ७८.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा आजच्या तारखेला ८.०४ टीएमसी कमी असून, एक जूनपर्यंत वीजनिर्मिती व सिंचनासाठी जलवर्ष पार पाडताना पाणी वापरावर मर्यादा येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाच्या कृपेने धरणाच्या पाणीसाठ्याने शतकाच्यावर वाटचाल केली होती. मात्र, यावर्षी ऑगस्टअखेरपासून पावसाने दडी मारल्याने व पुन्हा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने पाणीसाठा कमी झालेला पाहावयास मिळत आहे. आज धरणाचा पाणीसाठा ७८.८९ टीएमसी असून, गेल्या वर्षी तो ८६.९३ टीएमसी होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.०४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

यावर्षी जून व जुलैमध्ये सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे जलाशयात १५७.०५ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यापैकी अतिवृष्टीच्या काळात पायथा वीजगृहातून ८.४६ टीएमसी व सहा वक्र दरवाजांच्या सांडव्यावरून ५६.४५ टीएमसी असे एकूण ६३.९१ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडून दिले आहे. एक जूनपासून पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी जलवर्षात २५.५५ टीएमसी व पूर्वेकडे सिंचनासाठी १४.५६ टीएमसी असा एकूण ४०.११ टीएमसी पाण्याचा वापर केलेला आहे, तर ५.३८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झालेले आहे.

पोफळी टप्पा एक व दोनमधून ५१९.३३० दश लक्ष युनिट, पायथा वीजगृहातून १०९.७६८ दश लक्ष युनिट, कोळकेवाडी वीजगृहातून २५८.८२६ दश लक्ष युनिट व टप्पा क्रमांक चारमधून ४२०.४१९ दश लक्ष युनिट अशी एकूण १३०८.३४३ दश लक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी १४२९.७९४ दश लक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. मात्र, तुलनेने यावर्षी १२१.४५१ दश लक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झालेली पाहावयास मिळते. वीजनिर्मितीसाठी २५.५५ टीएमसी पाण्याचा वापर झालेला असून, कृष्णा पाणीवाटप लवादानुसार अजून ४२.९५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. एक जूनपर्यंत ते पुरेल यात शंका नाही. 

ऑगस्टपासून मॉन्सूनच्या व त्यानंतर परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे पायथा वीजगृहातून सिंचनासाठी पाणी सातत्याने सोडले गेलेले आहे. गेल्या वर्षी ८.६७ टीएमसी पाण्याचा वापर झालेला होता. मात्र, यावर्षी १४.०९ टीएमसी पाण्याचा झालेला वापर पाहाता पाच टीएमसी जादा पाण्याचा वापर पूर्वेकडे सिंचनासाठी झालेला आहे. सप्टेंबरपासून पाणी सोडल्याने हे चित्र पाहावयास मिळत आहे.

शिल्लक असलेला साठा समाधानकारक
राज्यावर दुष्काळाचे सावट असून, कोयना लाभक्षेत्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांच्या पूर्वेकडील तालुक्‍यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. जलाशयातील शिल्लक पाणीसाठा व एक जूनपर्यंत वीजनिर्मितीबरोबर सिंचनासाठी शिल्लक असलेला साठा हा चिंता वाढविणारा नाही. अशी वस्तुस्थिती असली, तरी दुष्काळी तालुक्‍यांसाठी पाणी सातत्याने सोडले व पुन्हा कर्नाटक राज्याला सहानुभूतीने पाणी देण्याची वेळ आली, तरी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, काटेकोर अंमलबजावणी व काटकसर याचा आधार घ्यावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com