कोयनेच्या पाण्याच्या बदल्यात वीज देऊ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - कोयना जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर अरबी समुद्रात वाया जाणाऱ्या पाण्याचे काय करायचे, याबाबत राज्यात अनेकदा विचारमंथन झाले असतानाच तेलंगण राज्याने "हे पाणी आम्हाला द्या, त्या बदल्यात तुम्हाला वीज देतो,' असा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवला आहे.

तेलंगणाचे पाटबंधारेमंत्री टी. हरीश राव यांनी नुकत्याच झालेल्या नदीजोड परिषदेत हा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, की कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर शेकडो टीएमसी पाणी अरबी समुद्रात वाया जाते. तेच पाणी कृष्णा नदीतून खाली सोडल्यास अलमट्टी, नारायणापूर, जुराळा, श्रीसैलम आणि नागार्जुन सागर या जलविद्युत प्रकल्पांतून महाराष्ट्राला आवश्‍यक वीज देऊ शकतो. यापूर्वी वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात वाहून जाणारे हे पाणी मुंबईत आणण्यासंदर्भातील प्रकल्प केंद्र सरकारकडे सादर झाला आहे. कोयना प्रकल्पातील वाया जाणारे पाणी मुंबई महापालिका व राज्यातील टंचाईग्रस्त भागांना, मराठवाड्यातील दुष्काळी भागांना पुरवण्यासाठी योजना राबवण्याची मागणी झाली होती. त्यानंतर नदीजोड प्रकल्पांतर्गत कोयनेचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देत संबंधित निकष शिथिल करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राला केली होती. महाराष्ट्राला सध्या वीज आणि पाणी दोहोंची टंचाई आहे. त्यामुळे राजकीय गणिते सांभाळत तेलंगणाचा प्रस्ताव स्वीकारावा की हे पाणी गरजू भागांना द्यावे, असे पर्याय सरकारसमोर आहेत.

Web Title: koyana water electricity telangan state proposal