कृपाशंकरसिंह यांचे कुटुंबीयसुद्धा दोषमुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केलेले माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकरसिंह यांच्या पत्नीसह कुटुंबीयातील पाच जणांना सत्र न्यायालयाने मंगळवारी पुराव्यांअभावी दोषमुक्त केले. या प्रकरणात कृपाशंकर यांना न्यायालयाने याआधी दोषमुक्त केले होते. त्यामुळे कृपाशंकर यांच्या कुटुंबाविरोधातील खटला निकाली निघाला. हा निकाल "एसीबी'साठी मोठी चपराक मानली जात आहे.

सत्र न्यायाधीश डी. के. गुडघे यांनी मंगळवारी कृपाशंकर यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनीता, जावई विजयसिंह आणि सून अंकिता यांना पुराव्याअंभावी दोषमुक्त केले. 274 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत कृपाशंकर यांच्याविरोधात "एसीबी'कडे 2010 मध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्याबाबत संजय तिवारी या सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यावर चौकशीचा आदेश दिला होता.

याप्रकरणी तीन वर्षे तपास करून चौकशीत मालमत्ता बेहिशेबी असल्याचा निष्कर्ष नोंदवत "एसीबी' तसेच आर्थिक गुन्हे शाखेने 2015 मध्ये कृपाशंकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने मंगळवारी कृपाशंकर यांच्या कुटुंबीयांनाही दोषमुक्‍त केले.

कृपाशंकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार?
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले कृपाशंकरसिंह हे भाजप सरकारच्या काळात निर्दोष मुक्त झाले आहेत. ते मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

Web Title: kripashankar singh family defect free