कृष्णा नदीकाठची पूररेषा बदलणार

Krishna-River
Krishna-River

पाटण, कऱ्हाड तालुका आणि सांगली जिल्ह्यासाठी बदल शक्‍य; नागरी वस्ती पुनर्वसनाबाबत निर्णय होणार
कऱ्हाड - कृष्णा काठावर उद्‌भवलेल्या महापुरात किमान पावणेचार लाख लोक बाधित होऊन कोट्यवधींची हानी झाली. महापुराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र गटाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाटण, कऱ्हाड तालुका आणि सांगली जिल्ह्यातील पूररेषाही बदलण्याचा धोरणात्मक निर्णय पुढच्या कालावधीत होण्याची शक्‍यता आहे. पूररेषा बदलताना त्यात येणाऱ्या नागरी वस्तीच्या पुनर्वसनाचा प्रश्नही शासनस्तरावर हाताळण्यात येणार आहे.

महापुराचा शास्त्रोक्त पद्धतीने स्वतंत्र अभ्यासासाठी गटाची स्थापना करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली आहे. त्यानुसार पाटबंधारे खात्याकडून त्याचा प्राथमिक सर्व्हे सुरू आहे. लवकरच त्याचा पहिला अहवालही मिळण्याची शक्‍यता आहे. सांगली महापुराची स्थिती हाताळण्याची अतिरिक्त जबाबदारी दिलेले मुंबई पालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांचे त्यावर नियंत्रण राहणार आहे.

कोयना, कृष्णा नद्यांना आलेल्या महापुरामुळे कऱ्हाड, पाटणसह सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली. कोल्हापूरला पंचगगेच्या पुराने हाहाकार माजवला. तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख लोकांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींची हानीही झाली. २५ वर्षांनंतर उद्‌भवलेल्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. कृष्णाकाठची पूररेषा बदलण्याची हालचालीही सुरू आहेत. त्याचा व्यापक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्याचे संकेत मिळत आहेत. महापुराची सर्वांत जास्त झळ कृष्णा काठाला बसली. कोयना काठावरही पाटणला सुमारे साडसातशे कुटुंबांना झळ सोसावी लागली.

कऱ्हाडलाही तितक्‍याच कुटुंबांना त्याची झळ बसली. दोन्ही तालुक्‍यांतील ८० गावे पाण्यात होती. सांगली जिल्ह्यात त्याचे प्रमाण मोठे आहे. ती सगळीच स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याची कारणे शोधण्यासाठी शासन स्तरावर हालचाली दिसत आहेत. मात्र, पावसाळ्यात कृष्णाकाठी अतिवृष्टी झाली तर काहीच उपाययोजना नव्हती, त्याच्या मर्यादा कृष्णेला आलेल्या महापुरात स्पष्ट झाल्या आहेत.

कृष्णा नदीत सातारा जिल्ह्यातील कोयना, मोरणा गुरेघर, तारळी, उत्तरमांड, महिंद, चिटेघर, धोम, कण्हेर आणि उरमोडी आदी धरणांच्या पाण्याची आवक होते. त्यानंतर पुढे वारणा व पंचगंगाही त्यात मिसळते. त्याचा अभ्यास होणार आहे. त्यासाठी धरणांच्या क्षमता तपासल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील पूररेषा २००५ मध्ये निश्‍चित झाली होती. अर्थात त्यावेळी आलेल्या महापुराने जाग आलेल्या पाटबंधारे खात्याने त्यात बदल केला होता. त्यानंतर पुन्हा यंदा आलेल्या महापुराने शासनाची झोप उडवली आहे. त्यामुळे पूररेषा बदलण्याचा घाट घातला जातो आहे. पाटंबधारे खात्याकडून २५ वर्षांत येणारा पूर म्हणून निळी व शंभर वर्षांतून येणारा पूर म्हणून लाल रेषा आखली जाते. शहर, पाटण तालुक्‍यासह बहुतांशी ठिकाणी यंदा कृष्णेच्या पुराने लाल रेषा ओलांडल्याने पूररेषा बदलण्याचा प्राथमिक सर्व्हेही लवकरच सुरू होणार आहे. कृष्णा काठावरील पुररेषा बदलण्याबरोबरच पंचगगा नदीच्या पुरामुळे कृष्णा नदीला येणारी फुग व त्यामुळे बाधित होणारी गावे, याचाही अभ्यास होणार आहे.

पूररेषा बदलण्याची शक्‍यता असून, शासनाने कृष्णा काठावरील महापालिका, पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायती यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे.
- राजेंद्र यादव, गटनेते, कऱ्हाड पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com