'श्रमदानातून शौचालय बांधण्यास पुढाकार घेणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: शौचालयनिर्मितीसाठी श्रमदान करण्यास सुरवात केली असून, सोलापूर जिल्ह्यापासून त्याची सुरवात झाली आहे. राज्यातील निवडक भागांत खोत हे स्वत: श्रमदानात सहभागी होणार आहेत. स्वच्छ गावांच्या निर्मितीसाठी शौचालय आणि शोषखड्डे बांधकामासाठी लोकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन खोत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत 106 तालुके आणि 14 हजार 470 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी 19 लाख 40 हजार 996 शौचालये बांधण्यात आली. या वर्षी 25 लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, वर्धा, सांगली आणि ठाणे या 7 जिल्ह्यांमध्ये कुटुंब तेथे शौचालय बांधले आहे.

खोत यांनी 15 एप्रिलला वाशीम जिल्ह्यात शेलू बाजार, पेडगाव आणि 16 एप्रिलला बुलडाणा जिल्ह्यातील हातणी येथे स्वत: श्रमदान करून राज्यातील जनतेला सकारात्मक संदेश दिला आहे. शौचालय बांधणीच्या कामात उत्तम काम करणाऱ्या ग्रामपंचायती व समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Labor will take the initiative to build the toilet