पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच

पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच  कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन, लॉजिस्टिक पार्क आदींचा विचार करून त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही कंपन्यांकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) अहवाल सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील महिनाभरात विमानतळासाठी भूसंपादन करण्याबाबतचा आदेश निघण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

पुरंदर येथील विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस विशेष नियोजन समिती म्हणून आणि २ हजार ८३२ हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावातील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच विमानतळाचा तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मन येथील डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सिंगापूर येथील चांगी एअरपोर्ट या कंपनीला देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांकडून अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सादर झाले आहेत.

विमानतळ उभारल्यानंतर ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे होण्यासाठी पूरक असलेल्या बाबींचा समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. कार्गो हब, लॉजिस्टिक पार्क आदी गोष्टींबरोबरच विमानतळापर्यंत येण्यासाठी मेट्रोचादेखील त्यामध्ये विचार करण्यात आला आहे. राज्य सरकारने विमानतळासाठी २८३२ हेक्‍टरची हद्द निश्‍चित करून दिली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात कोणत्या जागेवर विमानतळाची उभारणी करावी, ती जागादेखील या आराखड्यात निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच धावपट्टी, पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हब अशा कामांसाठी किती जागा लागणार आहे, कोणत्या दिशेला काय असणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार डार्स कंपनीने केला आहे. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे, हे निश्‍चित होणार असल्याने ते संपादित करण्याचे आदेश काढण्याचे काम शिल्लक राहिले आहे. ते आदेश पुढील महिन्यात निघण्याची शक्‍यता आहे.

पुरंदर विमानतळाच्या कोणत्या जागेवर विमानतळ आणि कोणत्या जागेवर इतर ॲक्‍टिव्हिटी, हे ठरविण्यासाठी डार्स आणि चांगी एअरपोर्ट यांना काम दिले होते. त्यांचे अहवाल कंपनीकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच भूसंपादनाचा आदेश काढण्यात येईल.
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी

भूसंपादन होणारे क्षेत्र
    वनपुरी    ३३९ हेक्‍टर
    उदाचीवाडी    २६१ हेक्‍टर
    कुंभारवळण    ३५१ हेक्‍टर
    एखतपूर    २१७ हेक्‍टर
    मुंजवडी    १४३ हेक्‍टर
    खानवडी    ४८४ हेक्‍टर
    पारगाव    १०३७ हेक्‍टर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com