जमिनीचा वाद भावकीच्या जिवावर ; तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

भावकीच्या जमिनीत समाधानकारक वाटा न मिळाल्याच्या मनात असलेल्या खदखदीतून पुतण्याने काकूसह वहिनी व पुतण्याचा खून करीत, एका पुतण्यास जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खेड (ता. इगतपुरी) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे घडली. 

घोटी : भावकीच्या जमिनीत समाधानकारक वाटा न मिळाल्याच्या मनात असलेल्या खदखदीतून पुतण्याने काकूसह वहिनी व पुतण्याचा खून करीत, एका पुतण्यास जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खेड (ता. इगतपुरी) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे घडली. 

हिराबाई शंकर चिमटे (वय 55), मंगला गणेश चिमटे (वय 30) आणि रोहित चिमटे (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. या हल्ल्यात यश (वय 6) हा जखमी झाला आहे. संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे (वय 23) याला ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीचे आई-वडील, दोन बहिणींना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. 

चिमटे कुटुंबीयांकडे चाळीस एकर जमीन होती. जमीन हरी नामदेव चिमटे यांच्या नावावर होती. चार वर्षांपूर्वी हरी हे मृत झाल्यावर उर्वरित चार भावांत जमिनीच्या वाटण्या झाल्या. मनासारख्या वाटण्या झाल्या नाहीत म्हणून लक्ष्मण, शंकर, भीमा व गणपत चिमटे यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण झाले. हे वाद सामोपचाराने मिटविण्यात आले. मात्र संशयित आरोपी सचिन गणपत चिमटेच्या मनात चुलते शंकर यांच्याबाबत राग कायम होता.

दरम्यान, भावकीतील कुटुंबाकडून "इतका शिकलेला असूनसुद्धा तुला नोकरी मिळत नाही' अशा वारंवार मिळणाऱ्या टोमण्याने संतप्त होऊन मी खून केल्याचा बनाव संशयित सचिन याने सुरवातीस केला होता. मात्र पोलिसांच्या खाक्‍यानंतर त्याने जमिनीच्या वाटणीवरून आपण हे कृत्य केल्याचे सांगितले. 

Web Title: Land disputes 3 murder by one youth