बोंगिरवार म्हणजे स्वतंत्र ‘पॅटर्न’ - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

 ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात आले. 

मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात आले. 

स्वर्गीय अरुण बोंगिरवार फाउंडेशन व ‘यशदा’च्या वतीने या वर्षीपासून अरुण बोंगिरवार उल्लेखनीय प्रशासकीय सेवा पुरस्कार देण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनातील विविध विभागांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज झालेल्या शानदार सोहळ्यात एन. वासुदेवन (कांदळवनांचे संवर्धन), पोलिस अधिकारी अभिनव देशमुख (आदिवासी व प्रशासनात सुसंवादाने विकास), गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनावणे (आदिवासींच्या शिक्षणात क्रांतिकारी कार्य), जिल्हाधिकारी अभिजित बांगर (आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाची अभिनव योजना) व जितेंद्र रामगावकर (इको टूरिझम) या अधिकाऱ्यांना ‘अरुण बोंगिरवार एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ने गौरविण्यात आले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘लोकाभिमुखता, सकारात्मकता व पारदर्शकता याची पायाभरणी बोंगिरवार यांनी केली. प्रशासनात कोणत्याही कामाला ‘आहे, होणार’ अशी सकारात्मक मानसिकता बाळगणारे ते होते. अनेक अधिकाऱ्यांचे ते आदर्श तर आहेतच; पण प्रशासनात आदर्श कामकाजाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून बोंगिरवार यांची छाप कायम आहे. राज्याच्या निर्मिती व उभारणीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अधिकारापेक्षा सामान्य माणसाला मोठे करण्याचा पॅटर्न बोंगिरवार यांनी निर्माण केला.’’

१९ मे हा अरुण बोंगिरवार यांचा जन्मदिन आहे. त्यामुळे या वर्षीपासून त्यांच्या जन्मदिनी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. या वेळी बोंगिरवार फाउंडेशनच्या अध्यक्षा लता बोंगिरवार, जिंदाल उद्योग समूहाच्या संगीता जिंदाल यांच्यासह प्रशासकीय सेवेतील आजी-माजी अधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेल्या कामाचे उत्तम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.  अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी धारणी तालुक्‍यातील आदिवासी भागातल्या गावात वीज नसल्याने अत्यंत सुपीक जमीन सिंचित होत नसल्याचे सांगितले. ‘‘जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर या गावांना भेट दिली. तापी नदीच्या किनारी असूनही गावे विजे अभावी कोरडवाहू होती. त्यामुळे पावसाळा संपला की लोक स्थलांतर करायचे. आम्ही सौरऊर्जेवर उपसा सिंचनाचा एक प्रकल्प उभारला. आता संपूर्ण गावांमध्ये वीज आलेली आहे,’’ असे बांगर म्हणाले.

पोलिस अधिकारी अभिनव देशमुख यांचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोलीसारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात त्यांनी मानवतेचा सेतू उभारला. सामान्य नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबाबतची धास्ती दूर करण्याचे काम देशमुख यांनी केले. त्यातून प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यात सुसंवाद झाल्याने विकासाच्या योजनांत स्थानिकांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी अरुण बोंगिरवार फाउंडेशन, यशदा व फेडेक्‍स या कंपनीचे सहकार्य लाभले, तर ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी आभार मानले.

‘माडिया मराठी बुक’
गटशिक्षण अधिकारी अश्‍विनी सोनावणे यांनी भामरागड तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा व शिक्षणाची विदारक स्थिती मांडली. या भागातल्या आदिवासींनी मातृभाषा मराठी नसल्याने त्यांना शिक्षणात रस नसल्याचे समोर आले. त्यामुळे ‘माडिया मराठी बुक’ ही संकल्पना राबविल्याने शाळांमधली हजेरी वाढली. मुले आनंदाने शिकू लागली. आता ती डॉक्‍टर, जिल्हाधिकारी होण्याची स्वप्ने पाहत आहेत. असा अनुभव त्यांनी सांगितला. आता कोरकू भाषेतही प्राथमिक शिक्षणाची पुस्तके तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Late Arun Bongirwar Foundation and YASHADA started giving a remarkable administrative service award