राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज; कार्यकर्ते आक्रमक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली, यादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख माध्यमांशी संवाद साधत असताना पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे.  शरद पवार यांना ईडीच्या सापळ्यात अडकवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असून त्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपले मत ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांसमोर मांडत होते, त्यावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दंडुक्यानी बेछुट मारहाण करायला सुरुवात केली. ही दडपशाही असून पोलिसांचे वर्तन पगारी खाकी गुंडासारखे आहे. पोलिसांची ही गुंडागर्दी चीड आणणारी आहे. मुंबई पोलिसांचा आजवरचा इतिहास दैदिप्यमान होता. परंतु खुनशी वृत्तीच्या फडणवीस सरकारने पोलिस दलाला भाडोत्री मारेकरी असे स्वरूप आणले असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक बोके यांनी म्हटले आहे. त्यांनी इशारा पोलिसांना इशारा देताना म्हटले आहे की, युवक संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या केसालाही धक्का लावण्याचा प्रयत्न यापुढे केल्यास राज्यातील सर्व तुरुंग ओसंडून वाहतील इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादी परिवार रस्त्यावर उतरेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lathicharge on NCP youth party workers in mumbai