डिसेंबरमध्ये विधानसभेची मध्यावधी निवडणूक! 

हरी तुगावकर
सोमवार, 12 जून 2017

लातूर - राज्यात अडीच वर्षांपासून भाजप व शिवसेना सत्तेत असले, तरी एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. मुख्यमंत्री अधिकारच देत नसल्याची नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना कधीही आपला टेकू काढून घेईल याची चर्चा सध्या सुरू आहे. यातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी (ता. 11) येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत डिसेंबरमध्ये विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागण्याचे संकेत दिले आहेत. 

राज्यात अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आले. शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. 1995 सारखे हे युतीचे सरकार व्यवस्थित चालेल असे सर्वांनाच वाटत होते; पण सरकार स्थापनेपासून या दोन्ही पक्षांत जमत नसल्याचेच सातत्याने समोर येत आहे. "संधी मिळाली, की सोडायची नाही,' असा पवित्राच शिवसेनेने घेतला आहे. त्यात शेतकरी कर्जमाफीचे आंदोलन समोर आले. सत्तेत राहूनही शिवसेनेने ते ऐरणीवर घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलण्याच्या अगोदर श्री. कदम यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक विश्रामगृहात घेतली. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निडवणुकीचा आढावा त्यांनी घेतला. आलेल्या अपयशाबद्दल यात त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. त्यासोबतच आता मागचे विसरून जा, डिसेंबरपर्यंत विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागणार आहे. त्यामुळे आतापासून कामाला लागा. घराघरापर्यंत जाऊन शिवसंपर्क अभियान राबवा. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन "मी कर्जमुक्त होणारच' हे अर्ज भरून घ्या. घरात बसून हे अर्ज भरून घ्या. पक्षाशी गद्दारी करू नका, असा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, श्री. कदम यांनी दिलेल्या संकेतानुसार डिसेंबरमध्ये खरेच मध्यावधी निवडणूक लागणार का? याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

आम्हाला अधिकारच नाहीत 
शिवसेनेकडून सरकारमध्ये राहून सातत्याने टीका केली जात आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत, हीच मोठी अडचण शिवसेनेची आहे. ती अडचण शिवसेनेचे नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी येथे पत्रकारांना बोलूनही दाखविली. पर्यावरणमंत्री असलो, तरी माझ्या खात्याला बजेट नाही, मलाही काहीच अधिकार नाहीत, केवळ नावाला सत्ता आहे, आमची भूमिका केवळ टेकूची आहे, योग्य वेळी हा टेकू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काढतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. 

Web Title: latur news ramdas kadam shiv sena