लातूर, उस्मानाबाद जूनपर्यंत दुष्काळमुक्त - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

किल्लारी - किल्लारीतील आपत्तीला आपण धैर्याने तोंड दिले. आता दुष्काळाची आपत्ती आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत जलयुक्तचे काम करून जूनपर्यंत हे दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लातूर व उस्मानाबाद जिल्हे पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्यासाठी किल्लारी येथे झालेल्या सुजलाम्‌ सुफलाम्‌ कार्याच्या निर्धार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. "किल्लारीच्या भूकंपानंतर शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले, त्यामुळे येथील गाव व माणसेही उभी राहिली. भूकंपग्रस्तांची कुटुंबे आता मोठी झालीत. या वाढीव कुटुंबांना घर किंवा प्लॉट देण्यात येतील.

पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या, त्यांनाही यात सामावून घेण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या भागात बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करून सौरऊर्जेचा त्यासाठी वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेचे काम वैज्ञानिक दृष्टीनेच होत आहे. आता दुष्काळाच्या आपत्तीला आपण सामोरे जात आहोत. भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांच्या सहकार्यातून दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येत आहेत. यासाठी शासनाच्या सर्व योजना एकत्र करून काम करण्यात येणार आहे. यात लोकसहभाग देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर काही जलतज्ज्ञ अनुकूल नाहीत, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच दुष्काळमुक्तीचे काम हाती घ्यावे, असा सल्ला पवार यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना दिला. भूकंपातील आठवणींना उजाळा देत, लोकांचे शिल्लक असलेले प्रश्‍न मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी सोडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुथा यांच्या कार्याचे कौतुक करत लोकसहभागाचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Latur Osmanabad Drought Free Chief Minister