सीबीआय कोठडीत आरोपींना मारहाणीचा वकिलांचा आरोप 

सीबीआय कोठडीत आरोपींना मारहाणीचा वकिलांचा आरोप 

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत असलेल्या अमोल काळेला कोल्हापूर तपास पथकातील अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मंगळवारी केला. याबाबत न्यायालयातही तक्रार अर्ज करण्यात आला आहे. 

हिंदू विधिज्ञ परिषद यांच्यातर्फे आज मुंबईत मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद झाली तेव्हा पुनाळेकर यांनी हा आरोप केला. दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी शरद कळसकरला सीबीआयचे अधिकारी पुण्याला घेऊन गेल्यामुळे इतर आरोपींना आठ सप्टेंबरला भेटू दिले नाही. त्यानंतर नऊ सप्टेंबरला आम्ही आरोपींची भेट घेतली असता, राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना कोल्हापुरातील तपास पथकातील अधिकारी तिरुपती काकडे यांनी सीबीआयच्या कोठडीमध्ये मारहाण केली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभागी असल्याची कबुली द्या; अन्यथा गंभीर छळाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचा आरोप पुनाळेकर यांनी केला. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याचीही दहा सप्टेंबरला भेट घेतली. त्यालाही याच अधिकाऱ्याने सीबीआय कोठडीमध्ये धमकावल्याचे सांगितले. सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांनी या कटातील सूत्रधार म्हणून वकिलांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकल्याचा दावाही पुनाळेकर यांनी केला. याबाबत सीबीआयने काहीही बोलण्यास नकार दिला. विचारणा करण्यात आल्यास न्यायालयात आपली बाजू मांडू, असे सांगण्यात आले. 

काकडे, नायर यांची नार्को टेस्ट करा 
मारहाण आणि दबावप्रकरणी काकडे आणि नंदकुमार नायर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्यांच्यासोबत आम्हीही या टेस्टसाठी तयार आहोत. त्यातून या प्रकरणामागील सत्य पुढे येईल, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com