सत्ता कशी मिळवायची हे माझ्याकडून शिका : आठवले

सत्ता कशी मिळवायची हे माझ्याकडून शिका : आठवले

सोलापूर : काँग्रेस सरकारच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी अत्यंत चांगली आहे. मोदींकडून गरिबांना न्याय दिला जात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारला आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. सत्ता कशी मिळवायचे हे त्यांनी माझ्याकडून शिकाव, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

रिपाइंच्या मेळाव्यानिमित्त सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, वंचित आघाडी करून सत्ता मिळेल अशा भ्रमात राहू नये. वंचित आघाडीचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यांनी भाजपचा अप्रत्यक्ष फायदा करण्यापेक्षा थेट सोबत यायला हरकत नाही. राजकीय हवा पाहून निर्णय घ्यायला हवा.

तसेच देशातील राजकीय पक्ष जाणीवपूर्वक एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोदींची ताकद वाढत आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला हात लागणार नाही, असा शब्द त्यांनी आम्हाला दिला आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे दलित आणि सवर्ण यांच्यातील कटुता कमी झाली आहे. नरेंद्र मोदींची लाट कमी झाली नाही. राहुल गांधी हे मोदींना पर्याय होऊ शकत नाहीत.

मी 1998 मध्ये दादरमधून निवडून आला होतो, तो मतदार संघ आम्हाला सोडावा अशी मागणी आहे. मुंबई, सोलापूरसह तीन जागा आम्ही मागणार आहोत. यावर मार्ग काढण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यातील मंत्रिमंडळात रिपाइंला दोन मंत्रिपदे देण्याचा शब्द दिला होता, तो पाळायला हवा. याबाबत लवकर निर्णय घ्यावा. माढा मतदार संघातून युतीकडून मला संधी मिळाल्यास शरद पवार माझ्या विरोधात लढणार नाहीत, असे सांगून आठवले यांनी अधिक बोलणे टाळले. 

रिपब्लिकन पक्ष एकत्र येत असतील तर माझी तयारी आहे. आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा. ते बाबासाहेबांचे नातू असल्याने मला त्यांचा आदर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. आम्ही एकत्र आलो तर मोठी आघाडी होईल. आता मी एकटा मंत्री आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर दोघेही मंत्री होऊ. आधी मी भाजप-शिवसेनेचा विरोधक होतो. कॉंग्रेसने आम्हाला काहीच दिले नाही. कॉंग्रेसला सत्तेवरून खाली घेण्यासाठी मी शिवसेना-भाजपसोबत आलो. भाजप हा जातीयवादी पक्ष नाही. या पक्षात सर्व जातीधर्माचे लोक आहेत. मागासवर्गीय महामंडळाचे आठशे कोटी कर्ज माफ करावे, अशी आमची मागणी आहे, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. 

सोलापुरातील वाद मिटविणार

सोलापुरातील रिपाइंमध्ये असलेल्या वादावर बोलताना आठवले म्हणाले, "सर्वच पक्षात मतभेद असतात. जेवढा वाद होईल तेवढा पक्ष मोठा होईल. दोन गटांचे दोन मेळावे झाले तरी सर्वजण माझेच आहेत. वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

मोदी पुन्हा सत्तेत येतील यात शंका नाही

राफेलच्या मुद्यावरून सातत्याने आरोप करून राहुल गांधी लोकांना गाफील करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. 2019-20 चे अर्थसंकल्प देशातील लोकांच्या हिताचे आहे. जीवनावश्‍यक वस्तूंवरील कर कमी केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येईल याबाबत आम्हाला शंका नाही.

शिवसेना-भाजपने एकत्र यावे 

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपने एकत्र यावे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाइं एकत्र आले तर 43 जागा निवडून येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com