खबरदारी घ्या ! आता एका रुग्णामागे दहा जणांची विलगीकरणात रवानगी

तात्या लांडगे
Sunday, 28 June 2020

महापालिकेच्या आरोग्याधिकारी म्हणाल्या... 
शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार नियोजन केले आहे. एका रुग्णाच्या संपर्कात हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील किमान 10 व्यक्‍ती असतातच. त्यामुळे रुग्णाच्या थेट संपर्कातील किमान दहा व्यक्‍तींना आता विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यासाठी सोलापुरात दहा ठिकाणे निश्‍चित केलेली आहेत. त्याठिकाणी किमान पाच हजार लोक राहू शकतील, अशी व्यवस्था यापूर्वीच केलेली आहे. 
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा मृत्यूदर व कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने विलगीकरण कक्षातील व्यक्‍तींची संख्या वाढविण्याचे उद्दिष्टे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महापालिका प्रशासनास दिले. या पार्श्‍वभूमीवर आता एका रुग्णामागे त्याच्या थेट संपर्कातील किमान दहा व्यक्‍तींची रवानगी विलगीकरण कक्षात केली जात आहे. 

सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा राज्यात एक नंबरचा आहे. मात्र, एकूण मृत्यू झालेल्या 238 रुग्णांपैकी 17 टक्‍के व्यक्‍ती कोरोना या विषाणूमुळेच तर उर्वरित 83 टक्‍के व्यक्‍ती त्यांच्या पूर्वीच्या आजाराने मृत पावल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सोलापुरात 63 टक्‍के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही चांगला असल्याचे कौतूक केले. मात्र, शहरातील कोरोना विषाणूची साखळी अद्याप खंडीत झाली नसून मागासवर्गीय भागात तथा झोपडपट्टी (स्लम एरिया) परिसरात एकाच घरात आठ-दहा लोक राहतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने आता विलगीकरण कक्षातील संशयितांची संख्या वाढविण्यावर महापालिकेने भर द्यावा, अशा सूचनाही केल्या. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिकेने रुग्ण सापडला की, त्याच्या थेट संपर्कातील किमान दहा लोकांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 

 

उद्दिष्टपूर्तीसाठी काहीपण नको... 
सोलापूर शहरात रविवारी (ता. 28) हैदराबाद रोडवरील ऋषीकेश नगरात एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्‍तींची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. मात्र, त्यावेळी एका रुग्णामागे दहा व्यक्‍तींना आणण्याचे उद्दिष्टे अधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळाली. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यायलाच हवी. परंतु, उद्दिष्टपूर्तीसाठी नियमबाह्य काहीही करु नये, अशी अपेक्षा सोलापुकरांनी व्यक्‍त केली आहे. दरम्यान, बाहेर उलट-सुलट चर्चा करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना समज दिली जाईल, असे आरोग्याधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. परंतु, पावसाळ्यात कोरोना संसर्गाची शक्‍यता असल्याने कोणतीही रिस्क न घेता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्‍तींना विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. त्यासाठी सोलापुकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

 

महापालिकेच्या आरोग्याधिकारी म्हणाल्या... 
शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार नियोजन केले आहे. एका रुग्णाच्या संपर्कात हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील किमान 10 व्यक्‍ती असतातच. त्यामुळे रुग्णाच्या थेट संपर्कातील किमान दहा व्यक्‍तींना आता विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यासाठी सोलापुरात दहा ठिकाणे निश्‍चित केलेली आहेत. त्याठिकाणी किमान पाच हजार लोक राहू शकतील, अशी व्यवस्था यापूर्वीच केलेली आहे. 
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At least 10 people in high-risk contact with one patient will now be placed in the isolation ward