
Teacher Salary Issue: एक तारीख सोडा, महिना संपतोय तरी नाहीत शिक्षकांच्या पगारी; कर्जाच्या हप्त्यांचे बिघडले समीकरण
Solapur News : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शिक्षकांचा पगार होण्यासंदर्भात राज्य सरकारने अनेकदा निर्णय घेतले, आदेश काढले. मात्र, मार्च महिन्यातील २२ तारीख गेली तरीदेखील शिक्षकांचा पगार अजूनपर्यंत झालेला नाही.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये नऊ हजार २०० शिक्षक कार्यरत आहेत. त्या एकाही शिक्षकाचे वेतन अजून झालेले नाही. (Latest Marathi News)
दुसरीकडे जिल्ह्यातील १५ खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन रखडले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा ७४ कोटी रुपये लागतात. तर सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शनसाठी १७ कोटी द्यावे लागतात.
मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार दोन टप्प्यात कराव्या लागल्या होत्या. पगारासाठी लागणारा पुरेसा निधी शासनाकडून मिळत नव्हता. आता एकदम निधी मिळू लागला, तरीपण वेतनासाठी विलंब लागतोय ही वस्तुस्थिती आहे.
बहुतेक शिक्षकांनी वेतनावर वेगवेगळ्या बॅंका, शिक्षक पतसंस्थांमधून कर्ज काढले आहे. वाहने, घरासह अनेक कारणांसाठी कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे.
पगारी वेळेवर होत नसल्याने अनेक शिक्षकांची पंचाईत होत आहे. बॅंकांचे हप्ते वेळेत भरले जात नसल्याने दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. (Latest Solapur News)
दरम्यान, आता ‘बीडीएस’वर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन वेतनाचा धनादेश बॅंकेत जमा केला जाणार आहे. त्यानंतर दोन-चार दिवसात वेतन होईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला.
संप काळातील वेतन मिळणार नाही?
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात जिल्हा परिषदेच्या अकराशे शाळांमधील जवळपास साडेचार हजार शिक्षक सहभागी झालो होते.
मंगळवार (ता. १३) ते शनिवारी (ता. १८) या काळातील आंदोलक शिक्षकांचे वेतन द्यायचे की नाही, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. पाच दिवसांची बिनपगारी रजा देखील टाकली जावू शकते, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.