राष्ट्रवादीपुढे पुन्हा कॉंग्रेसचे "लोटांगण'..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - आघाडी धर्मात सतत कॉंग्रेसला बॅकफुटवर ढकलण्याची परंपरा राष्ट्रवादीने या वेळीही कायम ठेवली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ कॉंग्रेसकडून काढून घेत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघदेखील स्वत:कडेच राखण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले. यामुळे राजकारणात कठीण काळ सुरू असल्याने राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यापुढे कॉंग्रेसला सपशेल लोटांगण घालावे लागल्याचे मानले जात आहे. 

विधान परिषदेच्या सहा जागी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या आघाडीत समेट झाला असला, तरी कार्यकर्ते व नेत्यांमध्ये मात्र धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजकीय वर्चस्वाने लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ कॉंग्रेसने राखला होता. मात्र या वेळी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला विश्‍वासात न घेता या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर करत कॉंग्रेसची कोंडी केली. अखेर सहापैकी प्रत्येकी तीन जागांचे सूत्र मान्य करत कॉंग्रेसने हा मतदारसंघ सोडला. 

दरम्यान, दोन जागांसाठी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीतही आघाडीचे सूर जुळले. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही या मतदारसंघावर ताबा मिळवण्यात कॉंग्रेसला अपयश आले. यामुळे नाना पटोले यांच्या दिल्लीतल्या राजकारणाला खीळ बसली असून, आता त्यांना आगामी विधान सभेसाठीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादीने परभणीची जागा कॉंग्रेसला सोडलेली असली, तरी लातूर-उस्मानाबाद-बीडमध्ये वंजारी समाजातील मातब्बर भाजप नेते रमेश कराड यांना उमेदवारी देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बेरजेच्या राजकारणाचे समीकरण जुळवले आहे. 

विधान परिषद जागावाटप 

राष्ट्रवादी 
1) लातूर-उस्मानाबाद-बीड : रमेश कराड 
2) नाशिक : ऍड. शिवाजी सहाणे 
3) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे 

कॉंग्रेस 
1) वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : इंद्रकुमार सराफ 
2) अमरावती : अनिल माधोगडिया 
3) परभणी-हिंगोली : सुरेश देशमुख 

Web Title: Legislative Council congress NCP politics