विधान परिषदेसाठी 74 टक्‍के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - आज मतदान झालेल्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी सरासरी 74.08 टक्‍के मतदान झाले. या निवडणुकीत प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे.

मुंबई - आज मतदान झालेल्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी सरासरी 74.08 टक्‍के मतदान झाले. या निवडणुकीत प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे.

विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन; तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघातून तीन जागांसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, लोकभारती, कम्युनिस्ट पक्ष या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यांच्यासोबत अन्य अपक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची ठरली होती. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. रणजित पाटील, नाशिकमधून कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विक्रम काळे यांना पुन्हा संधी दिली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून रामनाथ मोते; तर नागपूर शिक्षक मतदारसंघातून ना. गो. गाणार भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून पुन्हा नशीब आजमावत आहेत. आमदार कपिल पाटील यांनी लोकभारतीच्या तिकिटावर नागपूर येथून राजेंद्र झाडे आणि कोकण मतदारसंघातून अशोक बेलसरे यांना तिकीट दिले होते. या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष; तसेच अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली. या निवडणुकीसाठी 74.08 टक्‍के मतदान झाले. निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.

मतदानाची टक्‍केवारी
1. नागपूर शिक्षक मतदारसंघ ः- 83.28
2. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ ः- 87.26
3. कोकण शिक्षक मतदारसंघ ः- 82.03
4. नाशिक पदवीधर मतदारसंघ ः- 54.38
5. अमरावती पदवीधर मतदारसंघ ः- 63.46

Web Title: Legislative Council voted 74 per cent