अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी साडेअकरा कोटींच्या पुरवणी मागण्या 

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 4 जुलै 2018

चंद्रपूर, कराड येथील विमानतळ धावपट्टी विकासासाठी पाच कोटी रुपये, तसेच चंद्रपूर, रत्नागिरी व कोल्हापूर येथील विमानतळ विकासासाठी 96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नागपूर : अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पात 11 हजार 445 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर येत्या नऊ व दहा जुलै रोजी चर्चा होईल. त्यामध्ये पुणे, नागपूर व मुंबई येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले. 

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गाजत असलेल्या तूरडाळ खरेदीसंदर्भात 1528 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नावनोंदणी करूनही ज्या शेतकऱ्यांची तूर व हरभरा डाळ खरेदी केली नाही, त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम जूनमध्ये आगाऊ खर्च केल्याचे सांगण्यात आले. 

चंद्रपूर, कराड येथील विमानतळ धावपट्टी विकासासाठी पाच कोटी रुपये, तसेच चंद्रपूर, रत्नागिरी व कोल्हापूर येथील विमानतळ विकासासाठी 96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वाढीव मानधन आणि भाऊबीज भेट योजनेसाठी 513 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: legislative monsoon assembly session in Nagpur