'लेक लाडकी' फक्त मोहिमेपुरती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

राज्यात मुलींचे प्रमाण कमी; भंडारा, परभणी, लातूरमध्ये मात्र वाढ

राज्यात मुलींचे प्रमाण कमी; भंडारा, परभणी, लातूरमध्ये मात्र वाढ
मुंबई - राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या मोहिमा राबवते, तरीही राज्यातील मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 मध्ये महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे 907 मुली असे होते.

मात्र 2016 मध्ये या गुणोत्तरात जवळपास 8 टक्के घट झाली आहे. 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 पर्यंत आला आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर कमी झाला आहे.

वाशीममध्ये लिंग गुणोत्तरात तब्बल 62 टक्के घट झाली आहे. वाशीमपाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्येही लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांतील मुलींचा जन्मदर 53 टक्के कमी झाला आहे. राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटल्याचे अहवालातून दिसत असले, तरी भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्के वाढला आहे. भंडाऱ्यापाठोपाठ परभणी आणि लातूरमध्येही मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.

प्रमुख महानगरांतही लिंग गुणोत्तरामध्ये घट झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते. सर्वसाधारणपणे एक हजार मुलांमागे 951 मुलींचे प्रमाण आहे. मुंबईचे लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे 936 मुली असल्याचे अहवालात म्हटले आहे. पुण्यात 2014 पर्यंत स्त्री-पुरुष जन्मदरात वाढ दिसत होती. 2015 मध्ये पुण्यातील लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे 891 मुली होत्या. 2016 मध्ये येथील मुलींचा जन्मदर जवळपास 53 टक्‍क्‍यांनी घसरला. त्यामुळे हे प्रमाण 838 वर आले.

मुलींच्या संख्येत झालेली घट
राज्यातील मुलींचा जन्मदर

2014 2015 2016
914 907 899

मुंबईत मुलींचा जन्मदर
2014 2015 2016
931 926 936

पुण्यात मुलींचा जन्मदर
2014 2015 2016
925 891 838

Web Title: lek ladaki campaign