एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांचे वेतन कमी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये ४८४९ कोटींची वेतनवाढ मिळाली; मात्र अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई -  महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये ४८४९ कोटींची वेतनवाढ मिळाली; मात्र अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असल्याची चर्चा सुरू आहे.

एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दर चार वर्षांनी वेतनवाढ मिळत असते. कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये मूळ वेतनात २.५७ टक्के वाढ मिळाली. अधिकाऱ्यांचा वेतनवाढ करार मात्र रखडला आहे. एसटी महामंडळात एक लाखाहून अधिक कर्मचारी आणि सुमारे १२०० अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांना अद्याप वेतनवाढ न मिळाल्याबद्दल त्यांच्या संघटनेने संताप व्यक्त केला आहे.

अधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाने तात्पुरती १० टक्के वेतनवाढ दिली; मात्र त्यामुळे पगारात काहीही वाढ झालेली नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अधिकाऱ्यांसाठी २०१६ ते २०२० असा वेतन करार होणे अपेक्षित होते. त्यातील तीन वर्षे उलटल्यावरही करार न झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ऑफिसर्स असोसिएशनने एसटी महामंडळाकडे मागणी केली असतानाही निर्णय होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लवकरच निर्णय?
एसटीच्या एका अधिकाऱ्याकडे वेतनवाढीसंदर्भात विचारणा केली असता, करार प्रलंबित असल्याचे त्याने मान्य केले. वेतन कराराबाबत अधिक बोलण्यास त्याने नकार दिला; मात्र लवकरच निर्णय होईल, असेही सांगितले. 

यांना वेतनवाढ  
वाहतूक निरीक्षक, प्रमुख कारागीर, लेखाकार, वरिष्ठ लिपिक.

यांना प्रतीक्षाच
सहायक वाहतूक अधीक्षक, आगार व्यवस्थापक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभाग नियंत्रक, सर्व विभागांचे महाव्यवस्थापक व उपमहाव्यवस्थापक.

Web Title: Less salaries of officer than ST employees