रेड, ऑरेंज, यलो अन् ग्रीन अलर्टचा नेमका अर्थ काय?

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पूरस्थिती निर्माण झाल्यावर नेहमी रेड, ऑरेंज, ग्रीन किंवा यलो अलर्ट जारी करण्यात येतो. नैसर्गिक संकटाच्यावेळी हे अलर्ट जारी करण्यात येतात. पण सातत्याने हे अलर्ट जारी केल्यावर हा प्रश्न पडतो की, ही अशी नावे का आहेत?

पुणे : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानंतर, पावसाची तीव्रता वाढल्याने मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी पूरस्थिती निर्माण झाल्यावर नेहमी रेड, ऑरेंज, ग्रीन किंवा यलो अलर्ट जारी करण्यात येतो. नैसर्गिक संकटाच्यावेळी हे अलर्ट जारी करण्यात येतात. पण सातत्याने हे अलर्ट जारी केल्यावर हा प्रश्न पडतो की, ही अशी नावे का आहेत? या रंगानुसार बदलणाऱ्या या अलर्टचा नेमका अर्थ काय? हे जाणून घेऊया.

रेड अलर्ट – 
रेड अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टच्या काळात  मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. रेड अलर्ट सर्वात धोकायदायक मानला जातो.

ऑरेंज अलर्ट – 
वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार ऑरेंज अलर्टच्या काळात घडू शकतात. गरज असेल तरच या काळात बाहेर पडाला हवे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असते किंवा ऑरेंज अलर्टचा तसा अर्थ असतो. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. ऑरेंज अलर्टच्या काळात परिस्थिती रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असते.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे नैसर्गिक संकट ओढावू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी प्रशासन यलो अलर्टचा आधार घेते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या तुलनेत यलो अलर्ट हा कमी धोकादायक मानला जातो. 

ग्रीन अलर्ट –
नैसर्गिकदृष्ट्या कोणतेही संकट नाही, सर्व काही ठीक आहे हा सिग्नल लोकांना देण्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात येतो. नैसर्गिकदृष्ट्या या काळात कोणतेही संकट नसते. सर्वच अलर्टच्या तुलनेत ग्रीन अलर्टच्या काळात आपण सर्वाधिक सुरक्षित आहोत असे मानण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets Know About Red Orange Yellow And green Alert