पुणेकरांना थोडासा दिलासा 

पुणेकरांना थोडासा दिलासा 

पुणे - उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. शहरात 43 अंशांवर गेलेला पारा घसरला असून, सोमवारी दिवसभरात 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभरात तापमान किंचित कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमानात लक्षणीय वाढ होऊन शंभर वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी तीन अंश सेल्सिअसने तापमान घटल्याने दिवसभर रस्त्यावर जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांची दाहकता कमी झाली. शहरात सरासरीपेक्षा 2.3 अंशाने तापमान जास्त असूनही नागरिकांना दोन दिवसांपेक्षा सुसह्य वातावरण अनुभवायला मिळाले. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट सलग पाचव्या दिवशी कायम होती. राज्यातील उच्चांकी तापमान 46.9 अकोलामध्ये; तर महाबळेश्‍वरमध्ये नीचांकी तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात चौथ्या दिवशी सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे होते. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरवात झाली असून, पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून उष्णतेची लाट राहणार नाही. मात्र राज्यातील हवामान कोरडे असल्यामुळे तापमानात लक्षणीय घट होणार नाही, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी दिली. 

विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट 
मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात ओसरल्याने दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात घट होऊन कोल्हापूर, सातारा, नाशिक, सांगली या जिल्ह्यांना काहीअंशी दिलासा मिळाला. सरासरीच्या तुलनेत मात्र कमाल आणि किमान तापमान जास्तच होते. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान 45.2 अंश सेल्सिअस जळगावमध्ये नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहील. मध्य महाराष्ट्रातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव ओसरणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

राज्यातील सोमवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
पुणे- 40.2 
लोहगाव- 41.6 
जळगाव- 45.2 
सोलापूर- 43.4 
सातारा- 40.6 
उस्मानाबाद- 43.3 
परभणी- 45.8 
औरंगाबाद- 43.8 
बीड- 44.4 
अकोला- 46.9 
अमरावती- 46.8 
नागपूर- 44.8 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com