मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी आज 'लाइव्ह संवाद'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला "मन की बात'मधून वेळोवेळी संवाद साधून तयार केलेल्या "पॅटर्न'ची देशभरात मोठी चर्चा असते. याचाच कित्ता गिरवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात "मी मुख्यमंत्री बोलतोय' हा नवा "पॅटर्न' तयार केला आहे. या नव्या कार्यक्रमातून बुधवारी ते राज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

"सह्याद्री' या निवासस्थानावरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार असले तरी, यात मुख्यमंत्र्यांसोबत राज्यभरातून निवडण्यात आलेले 40 विद्यार्थी थेट संवाद साधतील. हा कार्यक्रम राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी सह्याद्री वाहिनीसोबत खासगी वाहिन्यांवरही "मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम दाखविला जाणार आहे.

राज्यातील शिक्षणाच्या समस्यांसह मुख्यमंत्री स्वतः अनेक प्रश्‍न या निमित्ताने समजून घेणार असले तरी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील काही आठवड्यापासून बरीच तयारीही केली आहे. प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणाच्या संदर्भात नेमके प्रश्‍न आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांकडून प्रश्‍नावली आणि सूचना मागून घेतल्या होत्या. त्याला राज्यातील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 28 हजारांहून अधिक प्रश्‍न आणि सूचना या कार्यक्रमाच्या निमिताने उपस्थित केल्या आहेत.
यात शालेय शिक्षणातील गुणवत्ता, प्रवेश प्रक्रिया, "नीट'चा गोंधळ, अभ्यासक्रम त्यातील नवीन बदल आदी असंख्य विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी "मी मुख्यमंत्री बोलतोय'चा एक भाग पूर्ण केला असून, त्याला राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे या वेळी हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीसह विविध खासगी वाहिनीवरही दाखविला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: live communication chief minister with student