वकिलाच्या अवयवदानाने दोघांना जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे-औरंगाबाद - शहरातील 104 वे यकृत प्रत्यारोपण बुधवारी सह्याद्री रुग्णालयात झाले. शहरात केलेल्या 25व्या ग्रीन कॉरिडॉरमधून पुणे ते औरंगाबाद हे अंतर तीन तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आले. त्यामुळे एका रुग्णाला जीवनदान मिळाले. 

पुणे-औरंगाबाद - शहरातील 104 वे यकृत प्रत्यारोपण बुधवारी सह्याद्री रुग्णालयात झाले. शहरात केलेल्या 25व्या ग्रीन कॉरिडॉरमधून पुणे ते औरंगाबाद हे अंतर तीन तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आले. त्यामुळे एका रुग्णाला जीवनदान मिळाले. 

औरंगाबाद येथे ब्रेन डेड झालेल्या ऍड. बाळासाहेब देशमुख (वय 74) या रुग्णाने दान केलेल्या त्यांच्या यकृतसह डोळे आणि मूत्रपिंड अशा अवयवदानातून दोघांना जीवनदान आणि एकाला दृष्टी मिळाली आहे. ऍड. देशमुख हे काही खासगी कामानिमित्ताने औरंगाबादमध्ये आले होते. बीड बाह्यवळण रस्त्यावरील सूर्या लॉन्स येथे रविवारी (ता. 30) सायंकाळी सातच्या सुमारास चक्‍कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने तेथील माणिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र तीन दिवसांच्या परिश्रमानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे मंगळवारी (ता. 2) रात्री वैद्यकीय तपासणीत आढळले. ही माहिती मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांनी त्यांचे बंधू संजय गजानन देशमुख, मुलगा विक्रम, चेतन व पत्नी मनीषा देशमुख यांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाची इच्छा व्यक्‍त केली. त्यांच्याकडील प्रतीक्षा यादीनुसार यकृत पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात पाठविण्याचे ठरले. रक्तगटाच्या अहवालानुसार औरंगाबादच्या माणिक हॉस्पिटल येथे एका रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले; तर एका खासगी रुग्णालयास डोळे देण्यात आले. त्यामुळे एकाला दृष्टी मिळाली. 

देशमुख यांचे यकृत सह्याद्री रुग्णालयात आणल्यानंतर डॉ. बिपिन विभूते, डॉ. राहुल सक्‍सेना, भूलरोगतज्ज्ञ डॉ. मनीष फाटक, डॉ. संदीप कुलकर्णी या डॉक्‍टरांच्या पथकाने 41 वर्षांच्या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण केले. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये व समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकन यात सहकार्य केले. 

झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, ""पुण्यातील हे 104 यकृत प्रत्यारोपण ठरले. अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत असल्याने रुग्णांचे प्राण वाचले जात आहेत.'' 

Web Title: Liver transplantation