पंचरंगी लढतीने स्थानिक निवडणुकीत धुमशान 

पंचरंगी लढतीने स्थानिक निवडणुकीत धुमशान 

मुंबई - शिवसेना-भाजप युतीचा विषय संपल्यानंतर दोन्ही कॉंग्रेसची आघाडीत देखील काडीमोड निश्‍चित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरवात केल्याने राज्यातील दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या बहुतांशी निवडणुकीत पंचरंगी लढतीत धुमशान होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दुसरीकडे राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुरू झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काही तासांतच संपत असताना उमेदवारांच्या याद्या रात्री उशिरापर्यंत लांबल्या. 

राज्यातील दहा महापालिका आणि काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी असल्याने उमेदवारी मिळत नसल्याचे दिसून येताच बंडखोरी सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले, दिनेश पांचाळ यांच्यासह प्रभाकर शिंदे यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपमध्ये आयारामांना लगेच उमेदवारी मिळत असल्याने पक्षातील इच्छुक नाराज झाले आहेत. खासदार किरीट सोमया यांच्या मुलाला तिकीट मिळाले असताना मुलुंडचे स्थानिक आमदार सरदार तारासिंग आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नसल्याने ते नाराज झाले आहे. शिवसेनेतही अनेक पक्षांतील नेत्यांनी प्रवेश केला आहे. मात्र आयारामांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांचा विरोध असल्याने शिवसेनेत जास्त आयारामांना स्थान मिळणार नसल्याचे समजते. 

भारतीय जनता पार्टीने मुंबई महापालिकेसाठी सर्व उमेदवार निश्‍चित केले आहेत. मात्र यावर पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड नाराजीचे सावट आहे. शिवसेनेने आज पहिल्या यादीत 150च्या आसपास इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून, त्यांची अंतिम यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात येईल. राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेसाठी 54 उमेदवार घोषित केले असून मुंबई-ठाण्यासह अन्य ठिकाणचे उमेदवार निश्‍चित करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी सर्वांत आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 114 उमेदवारांची यादी जाहीर केली. कॉंग्रेसनेही आपले 114 उमेदवार घोषित केले. मात्र कॉंग्रेसची यादी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थांबवली असल्याने दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होण्याची धाकधूक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असल्याने आघाडीची आशा धूसर असल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

एमआयएम मुंबईत 55 जागा लढविणार 
दरम्यान, एमआयएम पक्ष मुंबईत 55 जागा लढविणार असून सोलापूर, नागपूर येथेही उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वारिस पठाण यांनी दिली. समाजवादी पक्षदेखील स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले. बहुजन समाज पार्टी राज्यातील दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. भाजपाकडून काही जागा पदरात पाडून घेण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रयत्न आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र असल्याने राज्यात बहुतांशी ठिकाणी पंचरंगी लढती होणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com