लॅाकडाउन संपेना; राज्य सरकारकडून ३१ जुलैपर्यंतची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने राज्य  सरकारने मागील तीन महिन्यांपासून सुरू  असलेला लॉकडाउन आज पुन्हा  ३१ जुलैपर्यंत म्हणजेच महिनाभरासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

मुंबई - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाउन आज पुन्हा ३१ जुलैपर्यंत म्हणजेच महिनाभरासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मिशन बिगीनअंतर्गत सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचे ठरविले असले तरीसुद्धा ‘संसर्ग संपेना आणि लॉकडाउन काही हटेना’, अशी स्थिती राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात सध्या जे निर्बंध आहेत ते ३० जूननंतरही कायम राहतील. राज्य सरकारने त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन यापुढे ३१ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विविध टप्प्यांमध्ये राज्य सरकार नागरिकांना काही सवलती देणार असल्याने हा लॉकडाउन पहिल्यासारखा कठोर नसेल अशी माहिती सूत्रांनी दिली. आता स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अथवा महापालिका आयुक्त आवश्यक वाटल्यास आणखी निर्बंध घालू शकतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या राज्यातील लॉकडाउनची मुदत ३० जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन उठविणार नसल्याचे सूतोवाच आज केले. केंद्र सरकारने लॉकडाउनबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही, मात्र महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अनलॉक-२’ बाबत केंद्र सरकारने नियमावली जाहीर केल्यानंतर राज्यातील नियमावली जाहीर केली जाऊ शकते.

  हे आवश्‍यक
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर
दोन व्यक्तींमध्ये
सहा फुटांचे अंतर 
दुकानात पाचपेक्षा
अधिक लोक नको
लग्नात पन्नासपेक्षा अधिक पाहुणे नको
अंत्यविधीलासुद्धा
५० लोकांचे बंधन
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान आणि तंबाखू बंद
कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग 
हँड वॉश, सॅनिटायझर सोबत बाळगणे गरजेचे
कार्यस्थळी नेहमी स्वच्छता ठेवणे गरजेचे
कार्यालयात कर्मचाऱ्यांत सुरक्षित अंतर हवे
बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील

  यांना सशर्त परवानगी 
अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार
खाद्य पदार्थांची
घरपोच सेवा 
सायकलिंग, धावणे,
चालणे, अन्य व्यायाम
वर्तमानपत्रांची छपाई
आणि वितरण
इतर दुकानेही महापालिका सूचनेनुसार उघडतील. 
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्यक प्रवासासाठी
दुचाकीवर फक्त 
चालकाला परवानगी
ऑनलाइन/दूरशिक्षण याला मान्यता असेल
सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती असावी 
केश कर्तनालय, स्पा, पार्लर यांना नियम पाळून मुभा

पोलिसांची नजर राहणार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी जिल्हाबंदी कायम असून, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. या आदेशांत सरकारने नागरिकांनी घ्यायची आरोग्याची काळजी, सोशल डिस्टन्सिंग यावर भर दिला आहे. अनावश्यक हालचालींवर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांच्या हालचालींवर पोलिसांची नजर असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown extension from State Government till 31st July