Lok Sabha 2024: भाजपकडून शिंदे गटाची मोठी कोंडी? कल्याणनंतर 'या' लोकसभेच्या जागेवर भाजपने थोपटले दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lok Sabha 2024

Lok Sabha 2024: भाजपकडून शिंदे गटाची मोठी कोंडी? कल्याणनंतर 'या' लोकसभेच्या जागेवर भाजपने थोपटले दंड

बुलडाणा: भाजपने नुकतेच महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत, मात्र या नियुक्त्या मतदार संघासाठी आहेत की भाजपच्या स्वबळासाठी? याबाबत संभ्रमावस्था असल्याने आज भाजपच्या सोबतीने महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भुवया निश्चितच उंचावल्या आहेत.

केवळ बुलडाण्या पुरता विचार करावयाचा झाल्यास, भाजपने बुलडाणा लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रमुखाची जबाबदारी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे दिली आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव खासदार आहेत.

त्यांच्यातील व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यातील छुपा संघर्ष बुलडाणेकरांसाठी नवा नाही. खासदार प्रतापरावांच्याच आग्रहामुळे गेल्या २०१९ च्या निवडणुकीत विजयराज शिंदे यांची शिवसेनेची उमेदवारी गेली होती. तेव्हापासून त्यांच्यातील राजकीय वैर अधिक गडद झाले.

या खासदारांच्या खेळीमुळे कंटाळून श्री शिंदे निवडणुकीपुरते वंचितचा हात धरून नंतर भाजपमध्ये दाखल झाले. शिवसेनेतील फुटी नंतर शिंदे गट अर्थात खासदार प्रतापराव व बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दोघेही भाजपच्या जवळ आले.

परिणामी माजी आमदार विजयराज शिंदे यांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. ज्यांच्याशी टोकाचे राजकीय वैर, त्यांच्याशी पक्ष म्हणून जुळवून घेण्याची अवघड समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली.

अशा व्यक्तिमत्वाकडे लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देऊन भाजप कोणता हेतू साध्य करीत आहे. ही विचार करायला लावणारी बाब आहे.

समजा शिंदे गटाने अर्थात प्रतापरावांनी खासदारकीची उमेदवारी मिळवलीही, तरी विजयराज शिंदे यांच्या निवडणूक प्रमुख या पदाला मान्य करून लढायला ते सहज तयार होतील का? आणि ज्या व्यक्तिमत्त्वामुळे आपले राजकीय अस्तित्वच धोक्यात आले, त्यांच्यासाठी विजयराज शिंदे जीवाचे रान करून त्यांना निवडून आणतील का? हे गणित सर्व सामान्य माणसालाही न समजण्याइतके अवघड नाही.

निवडणूक प्रमुख पदाची वर्णी लागल्यामुळे विजयराज शिंदे हेच लोकसभेचे उमेदवार राहतील असेही त्यांचे समर्थक म्हणू लागले आहेत.

अशावेळी जर भाजपचा श्री. शिंदे किंवा इतर कोणी उमेदवार राहिला तर जिल्ह्यातील दोन आमदारांना घेऊन शिंदे गटात येण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार प्रतापरावांचे काय ? असाही सवाल उपस्थित होऊ शकतो.

४० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा महाराष्ट्रात निवडून आणण्याची भाषा एकीकडे भाजप करीत असताना, बुलडाणा सारख्या ठिकाणी भाजपने लोकसभा निवडणूक प्रमुखांच्या निवडीमध्ये कोणते निकष लावले हे समजणे जरा अवघडच आहे.

सहाजिकच २०२४ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना उमेदवारी हवी आहे. नेमके अशाच वेळी त्यांचे कट्टर विरोधक निवडणूक प्रमुख करून भाजप नेतृत्वाने कोणती राजकीय निपुणता दाखविली हे भल्या भल्यांना समजण्यापलीकडचे आहे.