Loksabha 2019 : ...अन्यथा भाजपला मतदारसंघ सोडेन!

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - सध्या ‘मातोश्री’वर दररोज उमेदवार निश्‍चितीसाठी विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या वेळी गटबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना ‘मी देईन त्याच उमेदवाराचे काम करा, नाहीतर मी तो मतदारसंघ भाजपला सोडेन,’ असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती केल्यानंतर आता उमेदवारीसाठी पक्षातच चुरस पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात स्थानिक पातळीवर सतत काम करून शिवसेनेचा स्वाभिमान राखल्यानंतर आता उमेदवारीचे काय, असा सवाल विविध जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना करत आहेत.

उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत शिवसेनेत मोठी गटबाजी उसळली आहे. विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे धरला आहे. उस्मानाबादचे खासदार प्रा. रवि गायकवाड यांच्याविरोधात स्थानिक शिवसैनिकांत मोठी नाराजी आहे.

खासदार झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याने मतदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांमध्येही गटबाजी असल्याचे समोर आले आहे. त्यांनाही उद्धव ठाकरे यांनी काम करा; नाहीतर भाजपला मतदारसंघ सोडेल, असा इशारा दिला. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुख्यमंत्री आज ‘मातोश्री’वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. ७) ‘मातोश्री’वर जाणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत प्राथमिक चर्चा करणार आहेत. या भेटीत राज्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत प्राथमिक चर्चा होणार आहे. यात प्रामुख्याने लोकसभा मतदारसंघाच्या अदलाबदलाविषयी चर्चा होणार आहे. तसेच, काही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपमधील नेत्यांचा वाद विकोपाला गेला आहे.

मराठवाड्यातील जालना मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे या ठिकाणी दगाफटका होऊ नये, यासाठी उभय बाजूंनी नेते आणि कार्यकर्ते यांना समज देण्यासाठी काही समान कार्यक्रम आखता येईल का, याबाबतही चर्चा होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांचा कडाडून विरोध आहे. यावर तोडगा काढण्याबाबत या बैठकीत खल होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com