Loksabha 2019 : राज्याची रणभूमी शांत; प्रचारास्त्रे म्यान

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 एप्रिल 2019

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.

मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे. 

या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी दिग्गजांनी शनिवारीही सभा, रोड शो करीत प्रचाराची राळ उडवून दिली.

हा शेवटच्या टप्प्यात शिवसेना-भाजप युतीसमोर मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. सलग सुट्या आल्यामुळे मतदानाचा टक्‍का वाढण्यासाठीही सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या चार पक्षांच्या अनेक दिग्ग्जांचे भवितव्य आजमावणारा हा टप्पा आहे.

देशात यंदाची सार्वत्रिक निवडणूक एकूण सात टप्प्यांत होणार आहे. राज्यात तीन टप्प्यांतील मतदान झाले असून, चौथा टप्प्याचे मतदान सोमवारी होणार आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे.  चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानादरम्यान सलग सुट्या आल्या आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि मतदानाच्या दिवशी खासगी आस्थापनांनीदेखील सुटी देण्यात आली आहे. यामुळे सलग तीन दिवस सुटी आली आहे. यामुळे मुंबईकर पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. परिणामी, मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे मतदानाचा टक्‍का वाढविण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांपुढे असेल.

येथे मतदान 
शिर्डी, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, शिरूर व मावळ.

नंदुरबार - के. सी. पाडवी (काँग्रेस) विरुद्ध खासदार हीना गावित (भाजप)
धुळे - कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) विरुद्ध डॉ. सुभाष भामरे (भाजप)
दिंडोरी - धनराज महाले (राष्ट्रवादी) विरुद्ध भारती पवार (भाजप)
नाशिक - समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर - बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) विरुद्ध राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडी - सुरेश टावरे (काँग्रेस) विरुद्ध कपिल पाटील (भाजप)
कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
ठाणे - राजन विचारे (शिवसेना) विरुद्ध आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
उत्तर मुंबई - ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस) विरुद्ध गोपाळ शेट्टी (भाजप)
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (काँग्रेस) विरुद्ध पूनम महाजन (भाजप) 
वायव्य मुंबई - संजय निरूपम (काँग्रेस) विरुद्ध गजानन कीर्तिकर (शिवसेना) 
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध मनोज कोटक (भाजप)
दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (काँग्रेस) विरुद्ध खासदार राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा (काँग्रेस) विरुद्ध अरविंद सावंत (शिवसेना)
मावळ - पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना)
शिरूर - डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
शिर्डी - भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) विरुद्ध सदाशिव लोखंडे (शिवसेना)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Publicity Stop Politics