
Loksabha Election: लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला १५ मतदारसंघ अनुकूल; सात मतदारसंघाचा आढावा बाकी
मुंबई - कर्नाटक विधानसभेत नुकत्याच मिळालेल्या अभूतपूर्व यशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यातील १५ मतदारसंघ हे पक्षाला अनुकूल असल्याचा निष्कर्ष प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी काढला आहे.
काँग्रेसने महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा गृहपाठ सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत ४१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरु होता. प्रत्येक मतदारसंघातील आमदार, माजी आमदार, माजी खासदार जिल्हाध्यक्ष यांच्याशी ज्येष्ठ नेत्यांनी संवाद साधला. मुंबईतील सहा आणि चंद्रपूर अशा सात मतदारसंघाचा आढावा बाकी आहे. अनुकूल असलेल्या पाच लोकसभा मतदारसंघांपैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचे (शिंदे गट) आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस यांची मविआ लोकसभेला सामोरे जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्यास किती जागा येतील, याची उत्सुकता आहे. आजच्या बैठकीत पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरूर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला गेला.
‘मविआ’त काँग्रेस लहान भाऊ नाही
आतापर्यंत ४१ मतदारसंघाचा आढावा पार पडला. पैकी १५ मतदारसंघ आम्हाला अनुकूल आहेत, असा अंदाज आहे. आणखी सात मतदारसंघाचा आढावा बाकी आहे. सर्व मतदारसंघांचा आढावा झाल्यावर ठोस निष्कर्षापर्यंत पोचू. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा काही लहान भाऊ नाही, असे आम्हाला आढावा बैठकीतून दिसून आल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.