लोकसभा लढणार - आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

औरंगाबाद - सध्या मी राज्यसभेत समाधानी नाही. त्यामुळे मला आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यासाठी मला सुरक्षित असलेला दक्षिण मुंबई किंवा विदर्भातील रामटेक मतदारसंघ हवा आहे. त्याविषयी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणेही झालेले असल्याचे स्पष्ट करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनातील इच्छा येथे व्यक्‍त केली. 

मिलिंद महाविद्यालयात उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुसूचित जाती समुदायास गॅस एजन्सीचे वितरण करण्यासाठी श्री. आठवले मंगळवारी (ता. आठ) शहरात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याचा माझा विचार आहे. सध्या या ठिकाणी शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आलेले आहेत. शिवसेना-भाजप युती झाली तर आपण या मतदारसंघाची मागणी करू, अन्यथा विदर्भातील रामटेकदेखील माझ्यासाठी सेफ आहे.  सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली असून, लवकरच त्या दोघांची भेट होणार आहे. यातून त्यांची नाराजी दूर होईल.

राहुल गांधीही दलितविरोधी नाहीत 
कुणी काहीही म्हणत असले तरी जसे पंतप्रधान मोदी दलितविरोधी नाहीत तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही दलितविरोधी नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

दररोज गट काढणाऱ्यांकडूनच ऐक्‍याची भाषा
दलित ऐक्‍याबाबत श्री. आठवले यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, की जे दररोज गट काढतात, तेच ऐक्‍याची भाषा करीत आहेत. ऐक्‍यात सामील होण्याची आपली तयारी आहे. खरे तर ऐक्‍याशिवाय आम्ही कुणालाच फिरू देणार नाही, असे आता दलित बांधवांनीच ठणकावून सांगायला हवे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आँधी और गांधी 
राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान होणार असल्याचे जाहीर केल्याचे श्री. आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी खास आपल्या शैलीत शीघ्रकाव्य म्हटले. ‘दस - पंधरा साल रहेगी नरेंद्र मोदी की आँधी, तो फिर कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी,’ ही रचनाच सादर केली. तसेच गांधी यांना पंतप्रधान होण्यास अजून वेळ असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. 

Web Title: loksabha election ramdas athawale politics