महाराष्ट्र : जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची चर्चा आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राज्य सरकार विधानसभा निवडणुकीपर्यंत जोमाने काम करणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत राज्याच्या मंत्रिमंडळात नाराज असलेल्या शिवसेनेला मानाचे पान देण्यात येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग देण्यात येणार असून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुखमंत्री म्हणून साथ मिळणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचेही नाव उपमुखमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुणाच्या नावावर शिक्‍कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडील आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार शिंदे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून, त्यांच्याकडे आरोग्य खाते सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर आणखी एखादे राज्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याची शक्‍यता आहे. एक-दोन राज्यमंत्रिपदावर भाजपच्या आमदारांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा एकत्रित लढणार
आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप युती एकत्रित लढणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. या चर्चेत जागावाटप आणि सत्तेतीला समाधानकारक वाटा शिवसेनेला मिळण्याच्या चर्चेवर शिक्‍कामोर्तब झाले होते. याच चर्चेच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुका एकत्रिक लढण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या चर्चेनुसार विधानसभेच्या जागांचे वाटप होणार असून, निवडणुका एकत्रित लढविण्यात येणार आहेत. तसेच लोकसभेच्या धर्तीवर विधानसभा निवडणुकाही युतीच जिंकेल, असा मला विश्‍वास वाटतो.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

Web Title: Loksabha Election Result Cabinet Expansion June