राज्यातील पोटनिवडणुका 28 मे रोजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

17 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू
मुंबई - लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर, भंडारा- गोंदिया मतदारसंघांसह सांगली जिल्ह्यातील पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

17 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू
मुंबई - लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर, भंडारा- गोंदिया मतदारसंघांसह सांगली जिल्ह्यातील पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भंडारा, गोंदिया, पालघर, तसेच सांगली येथे आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेत भंडारा- गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा- गोंदियाची जागा रिक्त झाली होती. भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा आणि कॉंग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पालघर तसेच पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने राज्यातील पोटनिवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे जाहीर केले आहे. केंद्रात आणि राज्यात सहभागी असलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका आणि निवडणुकीचे निकाल राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकतात.

पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर
पालघर, भंडारा- गोंदिया आणि पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्र लावले जाणार असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. मतदान यंत्राबाबत संशयाचे वातावरण असल्याने कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक अधिसूचना जारी करणे - 3 मे
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत - 10 मे
उमेदवारी अर्जांची छाननी - 11 मे
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत - 14 मे
मतदान - 28 मे
मतमोजणी आणि निकाल - 31 मे

Web Title: loksabha vidhansabha byelection