निमंत्रण आल्यास काँग्रेसचा प्रचार - यशवंत सिन्हा

Yashwant-Sinha
Yashwant-Sinha

नागपूर - पुढील महिन्यात होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ असून, काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचाराचे निमंत्रण आल्यास मी त्यांचा प्रचार करेन, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी जाहीर केले. 

अमरावती येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सिन्हा यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठवली. गेल्या साडेचार वर्षांत जनतेला सांगण्यासारखे कोणतेही काम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात नेहरू-गांधी परिवारावर टीका करीत आहेत. शासकीय कार्यक्रमांत राजकीय भाषण न देण्याचे किमान शिष्टाचारही ते पाळत नाही. मोदींच्या कार्यशैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था व स्वायत्त संस्थांचे सार्वभौमत्वही धोक्‍यात आले आहे. गेल्या साडेचार वर्षांत देशाची सर्व क्षेत्रांत पिछेहाट झाली आहे. २००८ मध्ये अमेरिकेतील सर्वांत मोठी बॅंक लेहमन ब्रदर्स नादारीत निघाल्याने अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक संकट आले होते. हीच स्थिती भारतातील बॅंकिंगव्यवस्थेची झाली आहे. जनतेमध्ये असंतोष असून ही नाराजी येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी महागठबंधनाची गरज पडणार नसून प्रादेशिक पक्षांतील समन्वयातून मोदींचा पराभव अटळ असल्याचा दावाही सिन्हा यांनी केला.

पुढील महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या राज्यांतील काँग्रेससह विरोधी पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निमंत्रण आल्यास मी जाईन. देशाला संभाव्य संकटातून वाचविण्यासाठी व देशातील स्वायत्त संस्थांचे रक्षण करण्यासाठी मी मोदी सरकारविरोधात प्रचार करेन, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

सर्वाधिकार ‘पीएमओ’कडे
देशातील सर्वाधिकार पीएमओत एकवटले असून अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री केवळ नावापुरतेच असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील या चारही मंत्र्यांना कोणतेही अधिकार राहिले नसून नोटाबंदीचा निर्णय अर्थमंत्र्यांना माहित नव्हता, परराष्ट्रमंत्री पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना भेटू शकत नाही, ‘राफेल’ सौदा करताना संरक्षणमंत्र्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. यातून पीएमओ निरंकुश सत्ता गाजवित असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com