शेतकऱ्यांकडून प्रति लिटर 50 ते 100 ग्रॅम दुधाची लूट

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 5 मे 2018

‘‘ शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या प्रमाणात योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी सरकारने अचूक वजन काट्यांची तत्काळ निर्मिती करावी.’’
- ज्ञानेश्‍वर दरेकर, शेतकरी, मु.पो.करंदी, पुणे
 

पुणे : राज्यातच नव्हे तर देशभरातील सहकारी दूध संघ, दूध डेअरी व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती कंपन्या शेतकऱ्यांकडून दूध इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून घेतात. मात्र हे इलेक्ट्रॉनिक वजन काटे अचूक नसून यामध्ये पन्नास ते शंभर ग्रॅमचा फरक पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी पन्नास ते शंभर ग्रॅम दूध अधिक द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या मापातच पाप असल्याचे दिसून येते.

देशभरात सहकारी दूध संघ, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना परंपरागत मापा ऐवजी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना प्रतिलिटर पन्नास ते शंभर ग्रॅम दूध अधिक घेतले जाते. अशा टीका करत सांगलीमध्ये नुकतेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी येथील वैध मापन शास्त्र कार्यालयात धुडगूस घातला होतो.

या संदर्भात वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक धनंजय कोवे म्हणाले, ‘‘ द्रवरुप दूध मोजण्यासाठी माप असते. ही पद्धत जुनी आहे. राज्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता दूध मापात मोजून घेणे अशक्य आहे. यासाठी अधिक वेळ खर्च होऊन दूध मापाने मोजून घेताना वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दिल्ली येथील वैध मापन शास्त्र संचालक कार्यालयातून प्रमाणित केलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर दूध मोजून घेऊन शेतकऱ्यांना पावती दिली जाते. मात्र या इलेक्ट्राॅनिक वजन काट्यांची अचूकता मापापेक्षा पन्नास ते शंभर ग्रॅमने अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या प्रति लिटर दुधासाठी पन्नास ते शंभर ग्रॅम अधिक दूध जाण्याची शक्यता आहे. ’’

‘‘ सध्या केंद्र सरकारने प्रमाणित केलेले इलेक्ट्राॅनिक वजन काटे प्रति लिटर पन्नास ते शंभर ग्रॅमने अधिकने अचुकता दाखवितात. त्यामुळे किमान दहा ग्रॅम अचुकतेचे इलेक्ट्राॅनिक वजनकाट्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.’’
- धनंजय कोवे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग

‘‘ शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या प्रमाणात योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी सरकारने अचूक वजन काट्यांची तत्काळ निर्मिती करावी.’’
- ज्ञानेश्‍वर दरेकर, शेतकरी, मु.पो.करंदी, पुणे
 

Web Title: Loot of 50 to 100 gm of milk per liter from the farmers in Maharashtra

टॅग्स