Jayant Patil News: राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट, जयंत पाटलांचा सभागृहात गंभीर आरोप | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil News

Jayant Patil News: राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट, जयंत पाटलांचा सभागृहात गंभीर आरोप

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात गंभीर आरोप केला आहे. हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे.

देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती त्यांनी विधानसभेत सादर केली.

जयंत पाटील म्हणाले, या प्रकरणामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा व्हावा. एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून दूध का दूध पानी का पानी करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.

नागपूर अधिवेशनात गाजलेला गायरान जमिनीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला आहे. जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. जयंत पाटील म्हणाले, गायरान जमिनीची स्थितीही फारशी वेगळी नाही.

एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना राहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे राहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाची दखल घ्यावी.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील जयंत पाटील आक्रमक!

कांदा उत्पादक, कापूस शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे.

या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.