थंडी वाढतेय

थंडी वाढतेय

पुणे - पुण्यातील किमान तापमानाचा पारा अवघ्या आठ दिवसांमध्ये ९.८ अंश सेल्सिअसने घसरला. गेल्या मंगळवारी (ता. २०) किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. 

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या प्रभावामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. काही भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. मात्र, त्याचा प्रभाव गेल्या आठ दिवसांमध्ये ओसरला. शहर आणि परिसरातील आकाश निरभ्र असल्याने किमान तापमानाचा पारा वेगाने घसरला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. पुढील चोवीस तासांमध्ये शहरातील थंडीचा कडाका कमी होईल, असा अंदाज आहे.

नोव्हेंबरमधील नीचांकी तापमान
यंदाच्या हिवाळ्यातील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद मंगळवारी (ता. २७) पुण्यात झाली. कमाल तापमानाचा पारादेखील सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढून ३०.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. तसेच पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

तापमानातील बदलाचा दुष्परिणाम
लहान बाळांच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पाहिजे. त्याच्या खाली शरीराचे तापमान जाऊ नये यासाठी उपाययोजना करावी.
वजन कमी आणि अपुऱ्या दिवसाच्या मुलांना कमी तापमानाचा त्रास जास्त होतो. त्यांची काळजी घेतली पाहिजे. 
लहान मुलांच्या डोक्‍याचा आकार मोठा असतो. त्यामुळे टोपडे घालणे, हात आणि पायमोजे घालावेत. 
श्‍वसन संस्थेचे आजार वाढतात. सर्दी आणि खोकला वाढतो. 
श्‍वासाचा वेग प्रमाणाबाहेर वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
रोटा व्हायरसचे प्रमाण वाढत आहे. सुरवातीला उलट्या आणि चोवीस तासांमध्ये जुलाब सुरू होतात. त्यासाठी मीठ, साखर, पाण्याचे मिश्रण द्यावे.    

राज्यात हुडहुडी वाढली
राज्याच्या तापमानात मोठी घट झाल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली घसरायला लागला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. नगर येथे नीचांकी म्हणजे १०.२ अंश सेल्सिअ तापमान नोंदले गेले. नाशिक, नागपूर, गोंदिया येथेही गारठा वाढत आहे. राज्याच्या तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीने हुडहुडी वाढविली आहे. पूर्व मध्य प्रदेशातील मांडला येथे तापमानाचा पारा सातत्याने ५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. राज्यातही विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. नगर, नाशिक, सांगली, सातारा, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com